ठाण्यात चाकरमानी मानदुखीने बेजार !

ठाणे स्थानकात पुलांवर तसेच फलाटावर नेहमीच चेंगरा-चेंगरी सदृश्य परिस्थिती असते. या गर्दीवर लवकर उपाय न योजल्यास येथेही एलफिन्स्टनसारखी चेंगराचेंगरी घडू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे.

ठाण्यात चाकरमानी मानदुखीने बेजार !
thane-passenger
Image Credit source: THANE
| Edited By: | Updated on: Nov 27, 2022 | 2:49 PM

अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची चेंगराचेंगरी टळावी यासाठी ठाणे स्थानकात अलिकडेच काही लांबपल्ल्यांच्या गाड्यांचे फलाट बदलले आहेत. परंतू त्यामुळे प्रवाशांची सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक झाली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सर्वाधिक गर्दी होणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी काही उपाय योजना केल्या आहेत. यातील काही योजना ताबडतोब लागू केल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे वांदे झाले आहेत.

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात मध्य आणि हार्बर असे दोन्ही मार्ग एकत्र येत असल्याने येथे नेहमीच गर्दीचा पूर वाहत असतो. गर्दीच्या बाबतीत ठाणे स्थानकाचा क्रमांक पहीला तर डोंबिवली स्थानकाचा दुसरा क्रमांक लागतो. ठाणे स्थानकात तब्बल 4 लाख 44 हजार प्रवासी दररोज येजा करतात.

ठाण्यात कोकणात जाणाऱ्या अनेक गाड्यांचा थांबा असून त्यासाठी चाकरमान्यांची या स्थानकात नेहमीच वर्दळ असते. मात्र कोकणातील गाड्यांचे फलाट काही दिवसांपूर्वी बदलल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

प्रवाशांना मोकळीक मिळण्यासाठी ठाणे स्थानकाच्या फलाट क्र. 5 व 6 आणि कल्याणच्या फलाट क्र.3 व 4 वरील स्टॉल व काही बांधकामांना हटवून प्रवाशांसाठी मोकळी जागा केली जात आहे. परंतू प्रवाशांना याचा फायदा होण्याऐवजी तोटा होत आहे.

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल यांनी आपल्या पदाचा भार सांभाळताच पहीलीच भेट ठाणे स्थानकाला भेट दिली. ठाण्यातील फलाट क्र. 5 वरूव 300 हून अधिक लोकल ट्रेन जात असतात. त्यामुळे या फलाटाचा भार कमी करण्यासाठी येथील या फलाटावरील मेल-एक्सप्रेसना दुसऱ्या फलाटांवर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चेंगरा-चेंगरी टाळण्यासाठी ठाण्यातील फलाट क्र. 5 व 6 वरून थांबा असणार्‍या 18 मेल-एक्स्प्रेसना फलाट क्र. 7 आणि 8 वर शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणखी 10 मेल-एक्सप्रेसना 7 आणि 8 क्रमांकाच्या फलाटावर शिफ्ट करण्याची रेल्वेची योजना आहे.

मध्य रेल्वेच्या या निर्णयाचा फटका चाकरमान्यांनाच अधिक बसला आहे. कारण नवा थांबा असलेल्या फलाटाला सरकते जिने किंवा लिफ्ट आणि इतर प्रवासी सुविधा नाहीत. चाकरमान्यांची सर्वाधिक पसंतीची आणि गर्दी हाेत असलेल्या  कोकणकन्या गाडीलाही याच फलाटावर थांबा आहे.

गणपती आणि होळीसाठी सामानसुमानासह गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता जिने चढून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना अवजड सामान घेऊन जिने चढताना प्रचंड  त्रास होत आहे. त्यामुळे फलाट क्र. 7 आणि 8 या फलाटांनाही सरकते जिने किंवा लिफ्टची सोय करावी अशी मागणी प्रवासी बळीराम राणे यांनी टीव्ही नाइन मराठीशी बोलताना केली आहे.

ठाण्याच्या 5 व 6 क्रमांकाच्या फलाटावरचे स्टॉलही हटविण्यात आले असून प्रवाशांची गर्दीपासून सुटका करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. कल्याण स्थानकाच्या फलाट क्र.3 व 4च्यावरील स्टॉल व काही बांधकामांना हटवून प्रवाशांसाठी मोकळी जागा केली जात आहे.