IND vs SA 1st T20i : टीम इंडियाचा दणदणीत विजय, कॅप्टन सूर्यकुमारकडून श्रेय कुणाला? हार्दिकबाबत म्हणाला…
Suryakumar Yadav Post Match Presentation : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी 20i क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम राखत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी दिली आहे. भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर पहिला विजय मिळवला.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20I सामना हा ओडीशा क्रिकेट असोसिएशनच्या कटकटमधील बाराबती स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियाने या टी 20i सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 101 धावांनी मोठा विजय साकारला. हार्दिक पंड्या याने साकारलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 175 रन्स केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाहुण्यात संघाला 74 रन्सवर ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेची टी 20I क्रिकेटमधील ही सर्वोच्च निच्चांकी धावसंख्या ठरली. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तसेच या धमाकेदार विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामना टीम इंडियाच्या बाजूने कुठे झुकला? हे सांगितलं.
कॅप्टन सूर्या काय म्हणाला?
टीम इंडियाने केलेल्या धावांबाबत सूर्याने समाधान व्यक्त केलं. भारताने अपेक्षेपेक्षा जास्त धावा केल्याचं सूर्याने म्हटलं. तसेच सूर्याने या दरम्यान टॉसचाही उल्लेख केला. ” आम्ही 50-50 ने बरोबरीत असल्याचं मी टॉसदरम्यान म्हटलेलं, मात्र पहिले बॅटिंग केल्याने फार आनंदी आहे”, असं सूर्याने म्हटंल.
तसेच सूर्याने खेळपट्टी पाहता टीम इंडियाच्या फलंदाजांनी केलेल्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला. “जेव्हा आपण खेळपट्टी पाहतो आणि आपण केलंय मिळवलंय, 175 धावा आणि 101 धावांनी विजय, याची आपण अपेक्षाही केलेली नसते. 48 धावांवर 3 विकेट्स आणि त्यानंतर 175 धावांपर्यंत पोहचणं. हार्दिक, अक्षर आणि तिलकने बॅटिंग केली आणि अखेरीस जितेशने योगदान दिलं, ते फार महत्त्वपूर्ण असल्याचं मला वाटतं”, असं सूर्याने नमूद केलं आणि फलंदाजांच्या कामगिरीचं कौतुक केलं.
आधी आम्ही 160 धावांपर्यंत पोहचू असं वाटलेलं. मात्र त्यानंतर 175 धावांपर्यंत पोहचणं अविश्वसनीय होतं. 7-8 फलंदाजांसह खेळताना कधी कधी फक्त 2-3 फलंदाजांचा दिवस असतो. मात्र त्यानंतरही इतर 4 फलंदाज डाव सावरतात. आज त्यांनी तसंच केलं. पुढील सामन्यात इतर फलंदाज डाव सावरताना दिसू शकतात”, असं सूर्याने म्हटलं.
सूर्या हार्दिकबाबत काय म्हणाला?
“अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह सुरुवातीला बॉलिंग करण्यासाठी एकदम योग्य होते. ज्या पद्धतीने त्यांनी (दक्षिण आफ्रिका) टॉस जिंकून नव्या चेंडूने बॉलिंग केली, ते पाहता अर्शदीप आणि बुमराह योग्य पर्याय होते. मात्र त्यानंतर हार्दिक दुखापतीतून परतल्याने त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं होतं. तसेच हार्दिकने ज्या प्रकारे बॉलिंग केली त्यासाठी मी फार आनंदी आहे”, अशा शब्दात सूर्याने हार्दिकच्या बॉलिंगबाबत आनंद व्यक्त केला.
