नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) हे पेशानं डॉक्टर आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेतून ते राजकारणात आले. महापौर ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री (Union State Minister of Fianance) पदापर्यंतचा त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून संपूर्ण देशात आपला ठसा उमटवत असतानाच त्यांच्यातील डॉक्टर त्यांनी कधीही बाजूला केला नाही. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. दिल्लीत एका टीव्ही कार्यक्रमात भागवत कराड सहभागी झाले होते. त्यावेळी एका कॅमेरामनला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो चालू कार्यक्रमातच बेशुद्ध होऊन कोसळला. त्यावेळी भागवत कराड यांनी पुढे होऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार (First Aid) केले. कराड यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Video : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी एका बेशुद्ध झालेल्या टीव्ही कॅमेरामनवर प्राथमिक उपचार केले, त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.#BhagwatKarad #Doctor #UnionFinanceMinisterofState #FirstAid
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा : https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/IWzsleQWrF
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2022
डॉ. भागवत किशनराव कराड यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चिखली गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कराड यांचे दहावीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळेत झाले. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री-मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी संपादन केली. एमएस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अती उच्च एम.सीएच (पेडियाट्रीक) ही मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर असल्याचा भागवत कराड यांचा दावा आहे.
डॉ. भागवत कराड आणि त्यांची पत्नी डॉ. अंजली कराड दोघांनीही डॉ. वाय. एस. खेडकर यांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. 1990 मध्ये ‘डॉ. कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर’ या नावाने हॉस्पिटल सुरु केले. अनेक वर्षे रुग्णसेवा केल्यानंतर 1995 साली औरंगाबाद महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी कराड यांना भाजपमध्ये प्रवेश दिला.