उद्धव ठाकरे यांची जवळची व्यक्ती जेलमध्ये जाणार? किरीट सोमय्या यांचा 500 कोटींच्या घोटाळ्याचा नवा बॉम्ब

| Updated on: Mar 04, 2023 | 8:05 PM

किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर थेट 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केलाय. या आरोपांमुळे एकच खळबळ उडालीय. संबंधित आरोपांप्रकरणी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय जेलमध्ये जातील, असा दावा सोमय्या यांनी केलाय.

उद्धव ठाकरे यांची जवळची व्यक्ती जेलमध्ये जाणार? किरीट सोमय्या यांचा 500 कोटींच्या घोटाळ्याचा नवा बॉम्ब
Follow us on

मुंबई : “खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे पार्टनर सुजित पाटकर (Sujit Patkar) यांचे पार्टनर राजू चहावाला हे जेलमध्ये गेले. आता नंबर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचा आहे. उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांनी आता तयारी करावी”, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. “रवींद्र वायकर यांनी 500 कोटींचा फाईव्ह स्टार हॉटेल घोटाळा केलाय”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. “रवींद्र वायकर यांनी ‘मातोश्री’ स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बैंक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला. गेले अनेक वर्ष यांनी जे सामान्य जनतेसाठी क्रीडांगण राखीव ठेवायचे होते त्यावर ते ‘मातोश्री’ क्लबच्या आणि सुप्रीमो बैंक्वेट नावाने रीतसर बँक्वेट, लग्नाचे हॉल तयार करण्याचे उद्योग करत आहेत”, असा धक्कादायक आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

“मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले जे खुले क्रीडांगण आणि गार्डनसाठी राखीव असलेल्या जागेवर रवींद्र वायकरांनी अनधिकृत कब्जा घेतला. तिथे 2 लाख वर्ग फुटांच्या जागेवर फाईव्हस्टार हॉटेल बांधायला सुरुवात केली. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर हे 5 स्टार हॉटेलचे बांधकाम सुरू आहे”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

“या हॉटेलची किंमत 500 कोटी रुपये इतकी होत आहे. रवींद्र वायकर यांनी ही जागा महल पिक्चर्स प्रा. लि. म्हणजेच सध्याचे मालक अविनाश भोसले, शहीद बालवा आणि विनोद गोएंका यांच्या कंपनीकडून स्वतः चा ताबा आहे असे भासवून ताब्यात घेतली. तसेच विकत घेतली आणि तिथे जे मुंबईतील जनतेसाठी आरक्षित असलेले क्रीडांगण आणि गार्डन होते त्या जागेवर सुप्रीमो या त्यांच्या कंपनीद्वारे आधी सुप्रीमो बॅंकवेट बांधलं”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“वायकर यांचा मातोश्री बँक्वेट अनधिकृत आहे. यात बागेचे आरक्षण दाखवत 4 कोटी रेडी रेकनर मूल्याचा भूखंड वायकर यांनी 3 लाखांना खरेदी केलाय. गेली अनेक वर्ष या जागेवर लग्न, पार्टी असे अनधिकृत व्यवहार रवींद्र वायकर करत आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.

’67 टक्के जागा ही मुंबई महापालिकेच्या ताब्यात’

“मुंबई महापालिकेशी 2004-05 दरम्यान हा जो करार झाला त्यात अलेली 67 टक्के जागा ही मुंबई महापालिकेच्या ताब्यात म्हणजेच सामान्य जागेसाठी आरक्षित क्रीडांगण, गार्डन म्हणून घोषित करण्यात आली. त्यात वायकर यांना या जमिनीवर कोणताही टीडीआर अधिकार राहणार नाही हे महानगरपालिकेशी मान्य करण्यात आले”, असं सोमय्या यांनी सांगितलं.

“मात्र ही 67 टक्के जमीन गेल्या 20 वर्षांपासून कधीच लोकांच्या ताब्यात देण्यात आलेली नाही अन् जागेचा वापर लग्नसमारंभासाठी केला गेला. त्यात 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने तत्कालीन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्याच जागेवर पुन्हा रवींद्र वयकरांनी कब्जा दाखवला. तिथे 2 लाख वर्ग फुटाच्या 5 स्टार हॉटेलच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. यावर आता वायकरांनी लगेचच हे बांधकाम सुरू केले आहे”, असा दावा सोमय्या यांनी केला.

“ही जनतेची जागा असताना येथे 500 कोटींचा फाईव्ह स्टार हॉटेल बांधले जात आहे. हे तात्काळ थांबवावं अशी विनंती मी पालिका, मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री, नगर विकास विभागाला करत आहे. रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रिमो बँकवेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.