बिहारमध्ये भाजपचा मोठा पराभव होताच बड्या नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, देशातलं वारं कोणत्या दिशेने…
बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या धक्कादायक पराभवानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली. गेल्या ३० वर्षांपासून ताब्यात असलेली जागा गमवावी लागल्याने युवकांमध्ये भाजपविरोधी तीव्र भावना असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जात आहे, याचे हे संकेत असून, तरुणाईच्या नाराजीमुळे भाजपला मोठे आव्हान उभे ठाकले आहे, असे चव्हाण म्हणाले.

बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा सडकून पराभव झाला आहे. गेल्या 30 वर्षापासून कब्जा असलेल्या जागेवर भाजपचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची ही जागा होती. तरीही भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. भाजपच्या या पराभवावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तरुणांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं आहे. देशाचं वारं कोणत्या दिशेनं वाहतंय हे स्पष्ट होत आहे, असं सूचक विधानच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. तीन पोटनिवडणूक होत्या, त्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर झाल्या होत्या. कॉकरोच आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, मोदी कशा प्रकार पॅनिक झाले हे आपण पाहिलं. मोदी रात्री इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत होते. देशात कुठल्या दिशेनं वारं वाहतंय, दातियामध्ये काँग्रेसचा विजय होताना दिसतोय. हा निर्णायक पोटनिवडणुकाचा निकाल आहे. बांकीपूर भाजपच्या अध्यक्षांचा मतदारसंघ आहे, प्रशांत किशोर तिथे विजयी झाले आहेत. युवकांनी या निवडणुकीत भाजपच्या विरोधात मतदान केलं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ते युवकांचं श्रेय
विरोधीपक्षाची एकजूट कायम ठेवणं गरजेचं आहे. युवकांना आंदोलनाचं क्रेडिट दिलंच पाहिजे. काँग्रेसनं या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. 20 तारखेनंतर काँग्रेस रस्त्यावर आले. कुणी क्रेडिट, श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. ते सर्व श्रेय युवकांचं आहे, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
काहीच होणार नाही
देशातील युवा पिढी भाजपवर प्रचंड नाराज आहे. नीटचा विषय आहे. त्यावर थातुर-मातुर उपाय योजना केल्यात. मोदी इन्स्टाग्रामवर गेले, कितीही व्हिडिओ केले तरी काही होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपबद्दल घृणा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत युवकांशी संवाद साधणार आहेत. त्यावरही चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना सावरायचा प्रयत्न करावा लागेल. देशातील युवकांच्या मनात भाजप सरकारबद्दल घृणा निर्माण झाली आहे. ती जाईल असं वाटत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
प्रशांत किशोर यांचा निर्णय…
इंडिया आघाडीतील प्रत्येक पक्ष आपली आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला भाजप सरकार खाली खेचायचं आहे. प्रत्येक राज्यात कशाप्रकारे आघाडी होईल ते पाहावं लागेल. इंडिया आघाडीची लोकं बैठकीत ठरवतील, असं सांगतानाच प्रशांत किशोरांबाबत निर्णय आमच्या पक्षाचे श्रेष्ठी घेतात, मी काय ठरवणारा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.