
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. काल संध्याकाळी ५:३० वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे आता छुप्या प्रचाराला वेग आला आहे. मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांमध्ये सध्या शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. अशाच शांततापूर्व स्थितीत मतदान व्हावे, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
मुंबईतील निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक सुरक्षा आराखडा राबवण्यात आला आहे. यानुसार उद्या मुंबईत १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपायुक्त (DCP) आणि ८४ सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) तैनात असणार आहेत. त्यासोबतच ३,००० हून अधिक पोलीस अधिकारी आणि २५,००० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी/होमगार्ड यांचा फौजफाटाही सज्ज असणार आहे.
तसेच मुंबईतील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर राज्य राखीव पोलीस दल (SRPF), क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) आणि बॉम्ब शोधक व नाशक पथके (BDDS) तैनात असणार आहेत.
मुंबईत उद्या सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात होईल. संध्याकाळी ५:३० पर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. मतदानाच्या दिवशी मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, शेअर बाजार (NSE/BSE) सुरू राहणार असून सेटलमेंटसाठी पुढील दिवसाचा कालावधी दिला जाईल. मतदानानंतर लगेचच १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
उद्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.