
महाराष्ट्रात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा धुराळा सुरु आहे. या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच महायुतीला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. मुंबईत महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा तांत्रिक फटका बसला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ मध्ये महायुतीचे उमेदवार निवडणूक न लढताच थेट रिंगणाबाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रभागांमध्ये यंदा मतदारांना कमळ किंवा धनुष्यबाण या चिन्हांना मतदान करता येणार नाही. विशेष म्हणजे, दोन्ही पक्षांनी अधिकृत एबी फॉर्म देऊनही ही नामुष्की ओढवली आहे.
मुंबईतील दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वॉर्ड क्रमांक २११ आणि २१२ या दोन वॉर्डांमध्ये महायुतीच्या समन्वयाचा किंवा नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. वॉर्ड क्रमांक २११ या प्रभागातून महायुतीच्या उमेदवाराने अर्ज भरण्याची तयारी केली होती. पक्षाने अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्मही दिला होता. मात्र, ऐनवेळी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न होऊ शकल्याने या उमेदवाराचा अर्ज दाखल होऊ शकला नाही. तांत्रिक बाबींच्या पूर्ततेत झालेल्या दिरंगाईमुळे हा मतदारसंघ महायुतीच्या हातातून निसटला आहे.
तर वॉर्ड २१२ मध्ये अधिकच नाट्यमय परिस्थिती उद्भवली. वॉर्ड २१२ मधील उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात धाव घेतली. मात्र अर्ज सादर करण्याची वेळ संपून गेली होती. उशिरा पोहोचल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी महायुतीचा उमेदवार रिंगणातून बाहेर पडला.
मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी एक-एक जागा महत्त्वाची असताना, दोन जागांवर उमेदवारच नसणे हे महायुतीसाठी मोठे नुकसान मानले जात आहे. यामुळे या प्रभागांमध्ये महाविकास आघाडी किंवा अपक्ष उमेदवारांचे पारडे जड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या हक्काच्या चिन्हांचा उमेदवार नसल्याने आता महायुती या प्रभागांमध्ये एखाद्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेसाठी सर्वच पक्षांच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यासाठी महायुतीतील भाजप १३७ जागांवर, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेत ६० ते ७० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र आले असून, ठाकरे गट १६४ जागांवर तर मनसे ५३ जागांवर निवडणूक लढत आहे. त्यासोबतच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली असून काँग्रेसने १३९ तर वंचितने ६२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.