
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. त्यातच आता मुंबईतील दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये राजकीय भूकंप झाला आहे. मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यानंतर ठाकरे गटाकडून ही जागा मनसेला देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या जागेसाठी आपले विश्वासू शिलेदार यशवंत किल्लेदार यांना या प्रभागातून रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे वॉर्ड १९२ या एकाच जागेसाठी चार प्रबळ दावेदार इच्छुक असल्याने हा वॉर्ड आता मुंबईतील सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरण्याची शक्यता आहे.
मनसेकडून या जागेसाठी यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर होताच मनसेच्या सरचिटणीस आणि दादरमधील अनुभवी नेत्या स्नेहल जाधव यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. जाधव कुटुंबाचा या वॉर्डवर गेल्या २० वर्षांपासून प्रभाव आहे. १९९२ ते २००७ या काळात स्नेहल जाधव स्वतः तीन वेळा नगरसेविका होत्या. तर २००७ ते २०१२ मध्ये त्यांचे पती श्रीधर जाधव निवडून आले होते. सलग चार वेळा विजय मिळवूनही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्या नाराज झाल्या आहेत. तसेच याबद्दल साधी चर्चाही न केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आता लवकरच त्या आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटातही या वॉर्डवरून पेच निर्माण झाला आहे. २०१७ च्या निवडणुकीत या प्रभागातून प्रीती पाटणकर निवडून आल्या होत्या. त्यामुळे या जागेवर त्यांचा नैसर्गिक दावा आहे. मात्र, हा वॉर्ड युतीच्या गणितात मनसेकडे गेला आहे. त्यामुळे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर आणि प्रीती पाटणकर कमालीचे नाराज आहेत. आपली उमेदवारी आणि वॉर्डावरील पकड कायम राखण्यासाठी पाटणकर समर्थकांसह लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे बोललं जात आहे.
या त्रिकोणी संघर्षात कुणाल वाडेकर हे चौथे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्या नाराजीचीही चर्चा सध्या दादरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाडेकर समर्थकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. तरी यशवंत किल्लेदारांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देऊन मनसेने आपली पहिली चाल खेळली आहे. मात्र, स्वकीयांची नाराजी आणि मित्रपक्षांतील इच्छुकांचे बंड शमवणे हे किल्लेदारांसाठी मोठे आव्हान असणार आहे. दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, अशातच आता या प्रभागात शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि मनसे विरुद्ध बंडखोर असा चौरंगी सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान १९२ या वॉर्डमधून मनसेकडून यशवंत किल्लेदार, काँग्रेसकडून दीपक भीकाजी वाघमारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.