
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी आता थेट राजधानी दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीने मुंबईत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता महापौर कोणाचा? या प्रश्नावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडवण्यासाठी काल रात्री उशिरा दिल्लीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे आणि भाजपकडून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हे उपस्थित होते. आता या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत भाजपने आपली ८९ जागांची ताकद पाहता महापौर पदावर दावा केला आहे. तर शिंदे गटाने आपल्या २९ नगरसेवकांच्या जोरावर किंगमेकरच्या भूमिकेत काही अटी समोर ठेवल्या आहेत. यावेळी शिवसेना शिंदे गटाने भावनिक आणि राजकीय असे दोन्ही मुद्दे उपस्थित केले आहेत. शिंदे गटाकडून महापौर पदासाठी अडीच-अडीच वर्षांच्या कार्यकाळाची मागणी केली जात आहे. या महापौर पदासाठीचा पहिला मान शिवसेनेला मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. येत्या २३ जानेवारीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या ऐतिहासिक वर्षाचे औचित्य साधून मुंबईचा महापौर शिवसेनेचाच असावा, अशी आग्रही मागणी राहुल शेवाळे यांनी लावून धरली आहे.
पहिल्या अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा महापौर आणि पुढील अडीच वर्षांसाठी भाजपचा महापौर असावा, असा प्रस्ताव शिंदे गटाने दिला आहे. तर दुसरीकडे, भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी पंतप्रधान मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, मुंबईच्या महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका. भाजप हा ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, त्यामुळे नैसर्गिकरीत्या महापौर पद भाजपलाच मिळावे, असा त्यांचा तर्क आहे.
तसेच जर महापौर पद भाजपने घेतले, तर त्या बदल्यात शिंदे गटाला स्थायी समिती (Standing Committee) आणि सुधार समिती (Improvements Committee) यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या समित्यांमध्ये झुकते माप देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. या बैठकीत केवळ महापौर नाही, तर खालील महत्त्वाच्या विभागांच्या वाटपावरही चर्चा झाली. आरोग्य आणि शिक्षण समिती या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे सुचवली आहेत. तसेच मुंबईच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यावरही या बैठकीत जोर देण्यात आला.
आता येत्या २२ जानेवारीला महापौर आरक्षणाची सोडत (Lottery) निघणार आहे. त्यानंतर २३ जानेवारी बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहेत. यानंतर ३१ जानेवारीला महापौर निवडणूक होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या दरम्यान महायुती आपला अधिकृत उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.