Bandra Gareeb Nagar : वांद्र्यात गरीब नगरमध्ये तीन-चार मजली झोपड्यावर थेट बुलडोझर Action, ही जमीन मोकळी करण्याचे 3 मोठे फायदे काय?
Bandra Gareeb Nagar : उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतर कालपासून रेल्वेने इथे 6 बुलडोझरच्या साहाय्याने पाडकाम सुरू केलंय. आज दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरूच आहे. रेल्वेची ही जमीन रिकामी करण्याचे तीन मोठे फायदे आहेत.

गरीब नगर भागात रेल्वे प्रशासनाकडून सुरु असलेल्या तोडक कारवाईचा आज दुसरा दिवस आहे. थेट बुलडोझर लावून अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या तीन-तीन, चार-चार मजली झोपड्या पाडण्यात येत आहेत. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करुन या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. वांद्रे पूर्वेला स्टेशनबाहेरचा हा परिसर आहे. ही तोडक कारवाई सुरु असताना कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वांद्रे पूर्वेला स्टेशन बाहेरच्या परिसरात या झोपडपट्ट्या उभारण्यात आल्या होत्या. आज सकाळी १० वाजल्यापासून अनधिकृत झोपड्यांविरोधात तोडक कारवाई सुरु झाली आहे. या कारवाईमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालय. मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे. रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलीस, महापालिका प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही संयुक्त कारवाई सुरू आहे.
रेल्वे मार्गालगत उभारलेली अनधिकृत घरे, पत्र्याच्या झोपड्या आणि काही व्यावसायिक गाळे हटवण्यासाठी जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. कारवाई सुरू होताच अनेक नागरिक प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. “आम्हाला पर्यायी जागा द्या, मगच कारवाई करा,” अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. काही नागरिक कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पोलीस परिस्थिती नियंत्रणात ठेवत आहेत.
अनेक वेळा नोटिसा दिल्या
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित जागा ही रेल्वेच्या मालकीची असून अनेक वेळा नोटिसा देऊनही अतिक्रमण हटवले जात नाही. त्यामुळे अखेर कारवाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. “रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि भविष्यातील विकासकामांसाठी अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे,” असे रेल्वे अधिकारी स्पष्ट करत आहेत. रेल्वे मार्गालगत वाढलेली झोपडपट्टी आणि अनधिकृत बांधकामांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचेही प्रशासनाने सांगितलं.
ही धडक मोहीम हाती घेतलीय
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेने ही धडक मोहीम हाती घेतलीय. कालपासून सुरू असलेल्या या कारवाईमुळे वांद्रे पूर्वमधील दोन रेल्वे पूल आजही बंद ठेवण्यात आलेत. अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवर हजारो बेकायदेशीर झोपड्या उभ्या होत्या. उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतर कालपासून रेल्वेने इथे 6 बुलडोझरच्या साहाय्याने पाडकाम सुरू केलंय. आज दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरूच आहे.
CPRO पश्चिम रेल्वेने काय म्हटलं?
“उच्च न्यायालयाचा कडक आदेश आहे. रेल्वेला चालना देण्यासाठी नवीन मार्ग टाकावे लागतील. त्यासाठी जमीन मोकळी करावी लागेल. ही कारवाई लोकांच्या सहकार्याने सुरू आहे.”
ही जमीन मोकळी करण्याचा 3 मोठे फायदे काय?
वांद्रे टर्मिनसचा विस्तार आणि 5वी-6वी लाईन टाकण्यासाठी ही जागा अत्यावश्यक आहे. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढेल. वाहतूक कोंडी कमी होईल.
रुळालगतच्या झोपड्यांमुळे अपघातांचा धोका कायम होता. अतिक्रमण हटल्याने प्रवाशांची सुरक्षा वाढेल.
रेल्वे परिसरातील कचरा, ड्रेनेज समस्या सुटतील. वांद्रे स्थानकाचा कायापालट करून ते वर्ल्ड क्लास टर्मिनस बनवण्याचा रेल्वेचा प्लॅन आहे.