झोपेतच हृदयविकाराचा झटका आला… मध्य रेल्वेची कमान सांभाळणाऱ्या विजय कुमार यांचे निधन
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे ५६ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नुकतेच १ ऑक्टोबर रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. जसलोक रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने रेल्वे प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, रेल्वे मंत्रालयापासून सर्व स्तरांवर शोककळा पसरली आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे आज, मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. विजय कुमार हे सकाळी झोपेतून उठण्याच्या तयारीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही गंभीर बाब लक्षात येताच त्यांना तातडीने दक्षिण मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
रेल्वे प्रशासनाचे मोठे नुकसान
विजय कुमार यांनी १ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या पदावर रुजू होऊन मध्य रेल्वेच्या कारभाराला काहीच महिने झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने रेल्वे प्रशासनात आणि सहकाऱ्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते १९८८ बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (IRSME) अधिकारी होते. रेल्वे सेवेत त्यांचा मोठा अनुभव होता.
विजय कुमार यांच्या निधनाच्या बातमीने रेल्वे मंत्रालयापासून ते मध्य रेल्वेच्या सर्व स्तरावर शोककळा पसरली आहे. रेल्वेतील त्यांच्या योगदानाबद्दल आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे ते सर्वांमध्ये आदरणीय होते. त्यांच्या निधनाने रेल्वे प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे.
विजय कुमार यांचा अल्पपरिचय
विजय कुमार यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून १ ऑक्टोबर २०२५ रोजी सूत्र हाती घेतली. त्याआधी ते चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (CLW) चे महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या नेतृत्वाखाली CLW ने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७०० लोकोमोटिव्हचे विक्रमी उत्पादन केले होते.
त्यांनी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज/चंदीगड येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. (B.Tech.) केले होते.
ते १९८८ बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (IRSME) अधिकारी होते. त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी उत्तर रेल्वे (Northern Railway), उत्तर पश्चिम रेल्वे (North Western Railway), रेल्वे बोर्ड (Railway Board), आरडीएसओ (RDSO) आणि एनएचएसआरसीएल (NHSRCL) अशा विविध ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या.
त्यांनी टॅल्गो चाचणी (Talgo trials), सेमी-हाय-स्पीड कॉरिडॉर आणि बुलेट ट्रेन प्रकल्पा मध्येही योगदान दिले होते.
त्यांनी सिंगापूर आणि मलेशिया येथे प्रगत व्यवस्थापन कार्यक्रम (Advanced Management Programme) आणि आयएसबी (ISB), हैदराबाद येथे धोरणात्मक व्यवस्थापन कार्यशाळेत (Strategic Management Workshop) सहभाग घेतला होता.