‘शरद पवारांकडेच काय, चहासाठी कुणीही बोलावलं तर मी जाईन’; छगन भुजबळ यांना नेमकं काय म्हणायचंय?

'टीव्ही 9 मराठी'च्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत छगन भुजबळ यांना शरद पवार यांच्याकडे जावासं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ यांनी आपण नुकतंच शरद पवारांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो, असं सांगितलं.

शरद पवारांकडेच काय, चहासाठी कुणीही बोलावलं तर मी जाईन; छगन भुजबळ यांना नेमकं काय म्हणायचंय?
मंत्री छगन भुजबळ
| Updated on: Sep 06, 2024 | 3:38 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी छगन भुजबळ यांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण त्या दिवशीत शरद पवारांच्या घरी गेलो होतो, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. शरद पवार त्यावेळी आजारी होते. तिथे आपण दोन तास बसलो. आम्ही एकमेकांचे दुश्मन नाहीत, असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच शरद पवारांकडेच काय, चहासाठी कुणीही बोलावलं तर मी जाईन, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.

भुजबळ नेमकं काय म्हणाले?

“त्यादिवशी गेलो होतो ना पवारांच्या घरी? साहेब आजारी होते. दोन तास थांबलो. आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही. राजकारणात एकमेकांच्या विरोधात आहोत. राजकारणात कुणाला दुश्मन समजत नाही. राजकीय विरोधक समजतो. आरक्षणासाठी मी पवारांकडेही जाईल. मोदींकडेही जाईल, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या घरीही जाईल. यापुढे कोणी कुठे असेल पण कुणी चहाला बोलावलं तर मी जाईल तिकडे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“मी अजितदादा आणि महायुतीची साथ सोडणार नाही”, असंदेखील छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केली. “अजितदादांच्या आमच्याकडे मोठ्या सभा झाल्या, लाडकी बहिणीच्या झाल्या. राजकारणात शंका घेऊ नका. राजकारणात शंका घेणं चुकीचं आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“जाहीरसभेत कार्यकर्त्यांनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी शायरी करतो. याचा अर्थ तलवार काढतो असं नाही. आता भेट दिलेली तलवार वर केली तरी पोलीस गुन्हा दाखल करतात. बाळासाहेब म्हणायचे गवताच्या पात्याला तलवारीची धार चढली पाहिजे. म्हणजे काय. कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी बोलावं लागतं. काही लोक उपोषणावेळीही पिस्तुल चालवतात”, असं छगन भुजबळ म्हणाले.