काल कार्यकर्ते, आज पदाधिकाऱ्यांची शिवाजी पार्कवर एंन्ट्री! स्थानिकांनी घेतला समाचार; आधी शाब्दिक वाद नंतर… व्हिडिओ व्हायरल
Mumbai CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनावरून शिवाजी पार्कवर कॉकरोच जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिकांमध्ये वाद झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

कॉकरोच जनता पक्ष २ ऑक्टोंबरला मुंबईत आंदोलन करणार आहे. शिवाजी पार्कवर हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र या आंदोलनाला आता वेगळं वळण मिळालं आहे. शिवाजी पार्क येथील स्थानिकांनी या आंदोलनाला विरोध दर्शवला आहे. यावरून काल आणि आज स्थानिक आणि सीजेपीचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीजेपीचे कार्यकर्ते आणि शिवाजी पार्क येथील स्थानिकांमध्ये वाद झाल्याचे चित्र दिसून आले आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलन करण्याला स्थानिकांचा विरोध आहे. प्रकाश बेलावडे हे भाजपचे पदाधिकारी आहेत. यांच्यासोबत शिवाजी पार्क येथील पदाधिकारी होते. काल देखील स्थानिकांनी CJP च्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले होते. यानंतर आज सीजेपीचे पदाधिकारी पाहणी करायला गेले असताना वाद झाला आहे.
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाचे आयोजन केले होते. पक्षाचे कार्यकर्ते योग्य जागेच्या शोधासाठी मैदानावर गेले होते. मात्र स्थानिक रहिवाशांनी नियोजित आंदोलनाला विरोध केला. शिवाजी पार्कच्या सभोवताली मोठ्या संख्येने निवासी इमारती असून तेथे मोठे कार्यक्रम आयोजित करण्याला स्थानिकांनी यापूर्वीही आक्षेप नोंदवला आहे.
मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देताना मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला दिला. शिवाजी पार्कमधील कार्यक्रमासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची परवानगी देखील आवश्यक आहे. परवानगी नाकारण्यामागे मैदानाच्या परिसरातील ध्वनी प्रदूषण, वाहतुकीत व्यत्यय येण्याची शक्यता आणि रुग्णालयांकडे जाणाऱ्या आपत्कालीन वाहनांच्या हालचाली ही कारणे देण्यात आली आहेत. शिवाजी पार्कचा शांतता क्षेत्रात समावेश असल्याचेही कारण देण्यात आले.
