BIG BREAKING | मोडेन पण वाकणार नाही, शेतकऱ्यांचा मोर्चा आता एकाच ठिकाणी तळ ठोकणार, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर मोठा निर्णय

| Updated on: Mar 16, 2023 | 7:59 PM

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या. पण शेतकरी आपल्या मागण्यांवर अंमलबजावणी झाल्याशिवाय संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत.

BIG BREAKING | मोडेन पण वाकणार नाही, शेतकऱ्यांचा मोर्चा आता एकाच ठिकाणी तळ ठोकणार, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर मोठा निर्णय
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) शेतकरी, कष्टकऱ्यांच्या 14 मागण्या मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो मोर्चा विधान भवनाच्या (Vidhan Bhawan) दिशेला निघाला होता तो मोर्चा आता वाशिममध्ये (Washim) काही दिवसांपूरता मुक्काम ठोकणार आहे. किसान सभेच्या शिष्ठमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या 14 मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे किसान सभा उद्या मोर्चा मागे घेणार असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली. पण किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आपण मोर्चा मागे घेणार नसून वाशिम येथे थांबून मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी वाट पाहणार असल्याचं सांगितलं. तसेच अंमलबजावणी होत नसल्याचं लक्षात आल्यास पुन्हा मोर्चा मुंबईच्या दिशेला यायला निघेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते जे. पी. गावित यांनी दिला.

“आमच्या मागण्यांवर बरीच चर्चा झाली. आमच्या मागण्यांवर चर्चा होऊन निर्णय झाले आहेत. मागच्या दोन मोर्चांचा अनुभव घेता जे आश्वासन दिलं जातं ते पाळलं जात नाही किंवा प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात नाही. आमच्या 17 ते 18 मागण्या या विचाराधीन आहेत. केंद्राच्या मागण्या चर्चेत आहेत. पण महाराष्ट्र सरकारच्या पातळीवरच्या मागणींवर सकारात्मक चर्चा झालीय. आमचा लाँग मार्च  मागण्यांवर अंमलबजावणी झाल्याशिवाय पुढे चालत राहणार, असा निश्चय घेऊन आम्ही आलो आहोत”, अशी प्रतिक्रिया जे. पी. गावित यांनी दिली.

“सरकारने आम्हाला मोर्चा स्थगित करण्याचं आवाहन केलं. आम्ही आमच्या मागण्यांसंदर्भात जीआर बनवून कलेक्टरकडे पाठवा आणि त्याची अंमलबजावणी सुरुवात झाली की आमचं आंदोलन मागे घेऊ. आम्ही फक्त आज थांबतोय. पण जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.  दोन दिवसात आदेश तळापर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली अशी माहिती घरच्या लोकांकडून निरोप आल्यानंतर आम्ही लाँग मोर्चा मागे घेऊ. पण यात दिरंगाई झाली आणि अंमलबजावणी झाली नाही तर तो लाँगमोर्चा मुंबईच्या दिशेला येईल”, असा इशारा जे. पी. गावित यांनी दिला.

“आम्ही मुंबईत आलो तर लोकांना तकलीफ होईल. ही गोष्ट आम्ही सरकारला निक्षूणपणे सांगितली आहे. आम्ही आजच्यापुरता आंदोलन थांबवत आहोत. आमचा मोर्चा तूर्त थांबलेला आहे. वाशिम नावाच्या गावात आम्ही थांबणार आहोत. जोपर्यंत निर्णयांची अंमलबजावणी होत नाही, सरकारची यंत्रणा तालुका पातळीवर काम करणार नाही. तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाहीत. ज्यादिवसी अंमलबजावणी होत नाही हे दिसेल त्यादिवशी आमचा मोर्चा पुन्हा मुंबईच्या दिशेला निघेल”, असा इशारा त्यांनी दिला.