महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग, शिंदे-फडणवीसांची रात्री उशिरा बैठक, कोणकोणत्या विषयांवर खलबतं?

| Updated on: Nov 08, 2022 | 4:31 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग, शिंदे-फडणवीसांची रात्री उशिरा बैठक, कोणकोणत्या विषयांवर खलबतं?
Follow us on

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. सत्तारांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातला कालचा संपूर्ण दिवस याच घटनेच्या विरोधात फिरत राहीला. पण काल म्हणजे सोमवारी फक्त हीच महत्त्वाची घटना घडली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा रात्री दहा वाजता तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात दाखल झाली. या घटनेनंतरही काही घडामोडी राहून गेल्या होत्या की काय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात जाऊन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. विशेष म्हणजे थोड्यावेळाने तोच शो मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सुरु केला. या सगळ्या घडामोडींनंतर रात्री उशिरा आणखी एक महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मॅरेथॉन बैठकीची.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार संभाजीराजे हे देखील उपस्थित होते, अशी माहिती समोर आलीय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्ग विकास प्राधिकरण स्थापना संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकार लवकरच गड किल्ल्यांसंदर्भात प्राधिकरण स्थापन करण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत शिवरायांच्या चित्रपटासंबंधित चर्चा झाल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत कदाचित अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. कारण फडणवीस सत्तारांच्या विधानावर काल दिवसभर काहीच बोलले नव्हते. पण आज त्यांनी सत्तारांनी केलेलं विधान चुकीचं होतं असं म्हटलं आहे. मंत्र्यांनी बोलताना भान राखावं, अशी जाणीव ही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून करुन दिली आहे.