शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार, सूत्रांकडून मोठी बातमी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांना सोबत घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या सर्व आमदार-खासदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार, सूत्रांकडून मोठी बातमी
| Updated on: Mar 15, 2023 | 12:18 AM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा अयोध्या (Ayodhya) दौरा ठरल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिलेलं आहे. त्या आमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे याचा हा दौरा महत्त्वाचा आहे. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“अयोध्या येथून महंत आले होते. त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. त्या निमंत्रणाचा मान ठेवून आम्ही लवकरच अयोध्येला जाणार आहोत. खरं म्हणजे अयोध्या हे आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच अयोध्येला जाऊ”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. दुसरीकडे शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के, भाऊ चौधरी, सुशांत शेलार अयोध्येत दाखल झाले आहेत. या तीनही नेत्यांकडून आज संध्याकाळी शरयू नदीवर आरती करण्यात आली.

शिंदे गटाने याआधी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं

महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यावेळी एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांसह गुवाहाटीला मुक्कामाला गेले होते. त्यावेळी सर्व आमदारांनी गुवाहाटी येथील प्रसिद्ध असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिराला भेट दिलेली. सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलेलं. तसेच नवं सरकार स्थापन झाल्यास आपण पुन्हा दर्शनासाठी येऊ, असा नवस त्यांनी केलेला. त्यानुसार महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलेलं.

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी शिवसेनेकडून अयोध्येतही शक्तिप्रदर्शन करण्यात आलेलं. पण या दौऱ्याला शिवसेनेच्या अनेक आमदार-खासदारांना जाता आलं नव्हतं. विशेष म्हणजे काही आमदारांना तर विमानतळावरुन परत घरी जावं लागलं होतं, अशी चर्चा मध्यंतरी रंगलेली. त्यामुळे एकनाथ शिंदे यावेळी सर्व आमदार-खासदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. सर्वच आमदार एकसमान आहेत, असा संदेश शिंदे यांना आपल्या नेत्यांना यातून द्यायचा आहे.