भाजीविक्रेता कोरोना पॉझिटिव्ह, गोपीटँक मंडई सील, दादर-माहिममधील मत्सप्रेमींवर संक्रांत

| Updated on: Apr 24, 2020 | 1:51 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Dadar Gopitank Mandai Seal). मात्र, तरीही नागरिक परिस्थितीला गांभिर्याने घेताना दिसत नाहीत.

भाजीविक्रेता कोरोना पॉझिटिव्ह, गोपीटँक मंडई सील, दादर-माहिममधील मत्सप्रेमींवर संक्रांत
Follow us on

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Dadar Gopitank Mandai Seal). मात्र, तरीही नागरिक परिस्थितीला गांभिर्याने घेताना दिसत नाहीत. माहिमच्या एल.जे. रोडवर मुंबई महापालिकेच्या गोपीटँक मंडईबाहेर लॉकडाऊननंतरही मासे खरेदीसाठी नागरिकांकडून तुफान गर्दी केली जात होती. विशेष म्हणजे काल (23 एप्रिल) याच मंडईच्या एका भाजीविक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.  त्यामुळे अखेर प्रशासनाने कारवाई करत गोपीटँक मंडई सील केली आहे (Dadar Gopitank Mandai Seal).

दर आठवड्यातील रविवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी गोपीटँक मंडईबाहेर मासे खरेदीसाठी लोकांची प्रचंड गर्दी जमते. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. अखेर महापालिकेने कारवाई करत मंडई पुढच्या दोन आठवड्यांसाठी सील केली आहे. त्यामुळे दादर आणि माहिम परिसरातील मत्सप्रेमींवर संक्रात ओढावली आहे.

माहिमच्या गोपीटँक मंडईत अनेक भाजीविक्रेते वास्तव्यास आहेत. या सर्वांना आता मंडईतच क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाणार आहे. या सर्व भाजीविक्रेत्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. गोपीटँक मंडई पुढचे दोन आठवडे बंद राहणार असून मंडईचे सर्व व्यव्हारही बंद राहणार आहेत. मंडईत कुणी जाऊ नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून गोपीटँक मंडईत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या भाजीविक्रेत्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. राज्यात काल (23 एप्रिल) दिवसभरात तब्बल 778 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजार 427 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे यात मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 4205 वर पोहोचला आहे. तर काल 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील 6, पुण्यातील 5, नवी मुंबई, नंदूरबार आणि धुळे मनपा येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे.