मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा थरार, यंदाची सर्वात मोठी हंडी कोणती? किती असणार बक्षीस? काय असणार खास? जाणून घ्या A टू Z माहिती

ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी २०२४ मध्ये शोले चित्रपटाच्या थीमवर आधारित असेल. या वर्षी २१ लाख रुपयांचे विक्रमी पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. १११ स्पॅनिश खेळाडूंचा सहभाग आणि गोविंदांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा थरार, यंदाची सर्वात मोठी हंडी कोणती? किती असणार बक्षीस? काय असणार खास? जाणून घ्या A टू Z माहिती
Dahi Handi Festival 2025
| Updated on: Aug 13, 2025 | 2:31 PM

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या दहीहंडी उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सध्या सर्वत्र धाकुमाकूम…धाकुमाकूम… गोविंदा रे गोपाळा असा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण यांसह ठिकठिकाणी भव्य दिव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. मुंबईतील लालबाग, दादर, वरळी या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचा थरार पाहायला मिळत आहे. तसेच ठाण्यातही अनेक ठिकाणी भव्य दहीहंड्या आयोजित केल्या जातात. ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी ही सर्वात मोठी मानली जाते. यंदाही आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीचे हे २० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांनी अनेक बक्षीस जाहीर केली आहेत.

यंदाची थीम शोले चित्रपटावर आधारित

प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडीची यंदाची थीम शोले चित्रपटावर आधारित आहे. या उत्सवा १११ स्पॅनिश खेळाडूंचा सहभागी होणार असून त्यात ते साहसी पिरॅमिडचा थरार दाखवणार आहेत. हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. यंदाच्या दहीहंडीला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. स्पेनमधील खेळाडूंचे पथक गेट वे ऑफ इंडिया मधून सलामी देऊन आपला थरार सुरू करणार आहे. या पथकात १११ खेळाडू असतील.

किती थरांसाठी किती बक्षीस?

या वर्षी जागतिक विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २१ लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे, तर ९ थर लावणाऱ्या पहिल्या पथकाला ११ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त, ८ थर लावणाऱ्या पथकाला २५ हजार, ७ थरांसाठी १५ हजार आणि ६ थरांसाठी १० हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. महिला पथकांनाही ७ थर लावण्याचे आव्हान असून, त्यांनाही योग्य बक्षिसे दिले जाणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदांच्या सुरक्षिततेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. सर्व गोविंदांना हेल्मेट, सेफ्टी किट, मॅट आणि जॅकेट वापरणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर आयोजकांनी १ लाख २६ हजार गोविंदांचा विमा काढला आहे. या दहीहंडी उत्सवात अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहेत. यंदा शोले चित्रपटाचे ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही थीम निवडण्यात आली आहे.

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या या भव्य दहीहंडीसोबतच धर्मवीर आनंद दिघे साहेबांची दहीहंडी (टेंभी नाका) आणि जितेंद्र आव्हाड यांची दहीहंडी (पाचपाखाडी) यांसारख्या इतर मोठ्या हंड्याही ठाण्यात प्रसिद्ध आहेत. पण विक्रमी बक्षिसे आंतरराष्ट्रीय पाहुणे आणि अनोख्या संकल्पनांमुळे संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी नेहमीच केंद्रस्थानी असते. संस्कृती युवा प्रतिष्ठान व्यतिरिक्त ठाण्यात आणखी काही मोठ्या दहीहंड्या आहेत, ज्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे:

धर्मवीर आनंद दिघे साहेबांची मानाची दहीहंडी (टेंभी नाका)

ठाण्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेली ही दहीहंडी शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाते. ही हंडी फोडण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये मोठी चुरस असते. या ठिकाणी ठाणे आणि मुंबईच्या गोविंदांसाठी वेगवेगळ्या हंड्या लावून प्रत्येकाला संधी दिली जाते. तसेच, महिला गोविंदा पथकांनाही विशेष पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान केला जातो.

स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी

भाजपचे स्थानिक नेते शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराने ही दहीहंडी आयोजित केली जाते. या दहीहंडीचे विशेष आकर्षण म्हणजे, इथे अंध मुलांकडून ५ थरांची सलामी दिली जाते, जे उपस्थितांचे लक्ष वेधून घेते. या दहीहंडीतही मोठ्या रकमेची पारितोषिके जाहीर केली जातात.

ठाण्यातील दहीहंडी केवळ एक धार्मिक उत्सव राहिलेला नाही, तर तो एक साहसी खेळ बनला आहे. ठाण्यातील बहुतांश मोठ्या दहीहंड्यांना राजकीय नेत्यांचा पाठिंबा असतो, ज्यामुळे त्यांना भव्य स्वरूप प्राप्त होते. ही एक प्रकारची राजकीय दहीहंडी बनली आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे खेळाडूंना अधिक सुरक्षितपणे खेळता येत आहे. या स्पर्धेदरम्यान हेल्मेट आणि मॅटचा वापर अनिवार्य केला जातो. त्यासोबतच शासनाने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याने, गोविंदांना भविष्यात नोकरी मिळवण्यासाठीही त्याचा फायदा होऊ शकतो. दहीहंडी दरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी आयोजक आणि प्रशासन विशेष काळजी घेतात.