
मुंबई, दि. ६ ( निखिल चव्हाण ) – इंडिगो विमान कंपनीची गेली अनेक दिवस सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु आहेत. पर्यायी विमानांच्या तिकीटाचे दरही अव्वाच्या सव्वा झाल्याने विमान प्रवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे मुंबई, बंगलोर, दिल्ली, पुणे अशा ठिकाणी प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.मध्य रेल्वेने यातून जादा गाड्या सोडून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
देशातील विमान कंपन्यासाठी नवे नियम केंद्र सरकारने जारी केल्यानंतर देशातील सर्वात स्वस्त दरात प्रवास घडवणारी विमान कंपनी इंडिगो हीचे धाबे दणाणले आहे. पुरेसे वैमानिक कर्मचारी नसल्याने इंडिगो कंपनीला अडचणी येत आहेत. त्यामुळे विमानतळांवर प्रवाशांना ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.यामुळे मध्य रेल्वेने जादा गाड्या सोडून यावर दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
विमान सेवा कोलमडल्याने मध्य रेल्वेने अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.
प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने विविध सण, हिवाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी 14 विशेष मागणीवर आधारित रेल्वे गाड्यांचे नियोजन करून त्यांची घोषणा केली आहे. या गाड्या मडगाव, नागपूर, बेंगळुरू, लखनऊ, गोरखपूर आणि हजरत निजामुद्दीन (दिल्ली) अशा विविध ठिकाणांदरम्यान चालवण्यात येणार असून राज्यांदरम्यान प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास घडवतील असे मध्य रेल्वेचे नियोजन आहे.
या विशेष गाड्यांमध्ये एसी प्रथम वर्ग, एसी 2-टियर, एसी 3-टियर, स्लीपर वर्ग आणि सामान्य द्वितीय वर्ग अशा सर्व श्रेणींचा समावेश असेल, ज्यामुळे सर्व प्रकारच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण केल्या जातील असे म्हटले जात आहे.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक:
लोकमान्य तिळक टर्मिनस ते लखनऊ – 6 डिसेंबर, दुपारी 12.15
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) – 6 डिसेंबर, सायं. 17.15
पुणे ते बेंगळुरू – 6 डिसेंबर, सायं. 19.00
नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – 6 डिसेंबर, रात्री 22.10
लोकमान्य तिळक टर्मिनस ते मडगाव – 7 डिसेंबर, सकाळी 11.10
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते नागपूर – 7 डिसेंबर, दुपारी 15.30
लोकमान्य तिळक टर्मिनस ते हैदराबाद – 7 डिसेंबर, सायं. 17.20
पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) – 7 डिसेंबर, रात्री 20.20
प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार मध्य रेल्वेतर्फे आणखी विशेष गाड्यांचे नियोजन केले जात आहे.