पुन्हा रात्रीच्या भेटीगाठी, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; पाऊण तासात काय घडलं?

निवडणूक आयोगाचा निकाल आला तर काय करायचं? दुसरा काही कायदेशीर मार्ग आहे का? यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या भेटीतील तपशीलाला कुणीही दुजोरा दिला नाही.

पुन्हा रात्रीच्या भेटीगाठी, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; पाऊण तासात काय घडलं?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 21, 2023 | 7:49 AM

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा भेट झाली. देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय घडलं? नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? हे सर्व गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. फडणवीस यांना रात्री उशिरा शिंदे यांची भेट घेण्याची गरज का पडली? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची वर्षा या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते. या तिघांच्या भेटी मागचं कारण अस्पष्ट असून दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली.

केंद्रीय निवडणुक आयोगाकडे शिवसेना व बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात ‘धनुष्यबाण’ या चिन्हावरून सुनावनी झाली. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असला तरी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान या विषयावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

निवडणूक आयोगाचा निकाल आला तर काय करायचं? दुसरा काही कायदेशीर मार्ग आहे का? यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या भेटीतील तपशीलाला कुणीही दुजोरा दिला नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शिंदेंचा दौरा रद्द

पंतप्रधानांचा दौरा होऊन दुसरा दिवस उजाडत नाही तोच मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौरा करणार होते. पण काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याने राजकिय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

चर्चा गुलदस्त्यात

या निवडणुकीत महापालिका निवडणुकांवर चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी चर्चा कशावर झाली हे अद्यापही गुलदस्त्यात असल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

पवार-शिंदे एकाच मंचावर

दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर येणार आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे बडे नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार असल्याने त्याकडेही सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.