मोठी बातमी ! युतीला नवा भिडू मिळणार?, देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यरात्री चर्चा; दोन तास खलबतं

| Updated on: May 31, 2023 | 8:05 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मध्यरात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

मोठी बातमी ! युतीला नवा भिडू मिळणार?, देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यरात्री चर्चा; दोन तास खलबतं
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. राज्यमंत्रिमंडळ विस्तार होणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मनसे आणि इतर समविचारी पक्षांना युतीत घेण्याबाबतच चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे युतीला नवा भिडू मिळणार असल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, मान्सूनपूर्व तयारी, युतीच्या आगामी सभा आणि दौरे यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पावसाळी अधिवेशनापूर्वी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच ही चर्चा झाली. यावेळी भाजपचा एकही नेता उपस्थित नव्हता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित नव्हते.

हे सुद्धा वाचा

विस्तारावर चर्चा

सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल दिल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. युतीच्या नेत्यांनीही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे नव्या विस्तारात किती जणांचा सामावेश करायचा, या विस्तारात कुणाकुणाला संधी द्यायची, कुणाला संधी नाही द्यायची आणि कुणाच्या नावावर आक्षेप आहे, यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पावसाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार होणार असल्याने त्यावरही या दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे.

समविचारी पक्षांना सोबत घेणार?

राज्यात महापालिका निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशावेळी युती भक्कम करण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. काल देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे सोबत येईल की नाही यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात नवीन समीकरणे होताना पाहायला मिळणार आहेत.