लग्न झालं तरी माझ्यामुळेच, पोरगा झाला तरी माझ्यामुळेच, ही प्रवृत्ती सोडा; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

| Updated on: Feb 26, 2023 | 2:32 PM

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन वर्षात हे काम होऊ शकतं तर 25 वर्ष राज्य करणाऱ्यांना सवाल का विचारू नये. ज्या प्रकल्पातून माल मिळतो तेच प्रकल्प हाती घेण्याचं यांचं धोरण होतं. पण आम्ही ते बदलून टाकलं आहे.

लग्न झालं तरी माझ्यामुळेच, पोरगा झाला तरी माझ्यामुळेच, ही प्रवृत्ती सोडा; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मुंबईतील विकासकामांच्या श्रेयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केलं असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतलं असं म्हणणं हस्यास्पद आहे. उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.

मुख्यमंत्री महोदय मला एक गोष्ट समजलीच नाही. आपण कोणतंही काम सुरू केलं तर काही लोक म्हणतात आमच्याच काळात झालं. अरे अडीच वर्षापैकी दोन वर्ष तर ते घरातच होते. दरवाज्याच्या आतच होते. अन् सहा महिन्यात त्यांनी मुंबई बदलून टाकली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोणतंही काम घेतलं तर आमच्याच काळात सुरू झालं असं सांगतात. काही लोकांची सवय अशी असते की, अरे याचा प्रवेश झाला मीच केला. अरे नोकरी लागली, मीच लावली. अरे लग्न झालं मीच जुळवून दिलं. अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला. ही जी सवय आहे ती आता सोडली पाहिजे. आता पोरगा झाला हा त्याच्या कर्तृत्वाने झालाय. लग्न केलं तर त्याच्या पसंतीने केलं. मला वाटतंय, मीच केलं मीच केलं हे सांगण्याची ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. अरे तुमच्या काळात काहीच झालं नाही. म्हणून तर ही मुंबईची अवस्था झालीय, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

हे सुद्धा वाचा

मुंबईकरांची क्षमा मागायचीय

मला मुंबईकरांची क्षमाही मागायची आहे. आम्ही एकाचवेळी अनेक कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होणार आहे. त्यामुळेच मुंबईकरांची क्षमा मागायची आहे. एकावेळी अनेक कामे घेतल्याने प्रदूषण होतंय. ट्रॅफिक जाम होतंय. पण काळजी करू नका. दोन तीन वर्षात ही कामे झाली की पुन्हा त्रास होणार नाही. नंतर 30 ते 40 वर्ष त्याकडे बघण्याची गरज पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महापालिका बँकेत पैसा गुंतवूण त्यांच्या इंटरेस्टवर जगण्यासाठी निर्माण झाली नाही. तर महापालिका जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याकरीता असते. म्हणून जनतेचा पैसा जनतेसाठी लावा, असे निर्देश दिले. मुंबईतील ज्या समस्या आहेत. त्या दूर कशा करता येईल याचे प्रकल्प आम्ही सुरू केले आहेत, असंही ते म्हणाले.

दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त होईल

दर पावसाळ्यात किंवा त्या दरम्यान तीन ते चार महिने माध्यमांमध्ये केवळ मुंबईतील खड्ड्यांची चर्चा असते. मुंबईच्या खड्ड्यांवर जेवढे मिम्स तयार होतात, तेवढे कोणत्याही गोष्टीवर होत नाही. ज्या महापालिकेकडे इतका पैसा आहे. 25 वर्ष राज्य करूनही रस्ते दुरुस्त करता येत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण त्यांना रस्ते बनवायचेच नव्हते. वर्षानुवर्ष एकाच रस्त्यावर पैसा खर्च केला जात होता. हे धोरणच नष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वच रस्ते काँक्रिटचे करायचे ठरवलं. एकदा रस्ता झाला तर त्यावर 50 वर्ष खड्डा पडता कामा नये असं काम सुरू केलंय. येत्या दोन वर्षात खड्डे मुक्त मुंबई होणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

ते धोरणच आम्ही बदलून टाकलंय

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन वर्षात हे काम होऊ शकतं तर 25 वर्ष राज्य करणाऱ्यांना सवाल का विचारू नये. ज्या प्रकल्पातून माल मिळतो तेच प्रकल्प हाती घेण्याचं यांचं धोरण होतं. पण आम्ही ते बदलून टाकलं आहे, असं सांगतानाच मुंबईची सफाई सुरू आहे. अनेक जागा स्वच्छ केल्या जात आहेत. लोकांना स्वच्छ हवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांच्या जीवनात गुणात्मक बदल व्हावा हा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.