दिशा सालियन प्रकरणाचं नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

खासदार संजय राऊत यांनी दिशा सालियन प्रकरणी 'नेपाळी कनेक्शन'चा धक्कादायक आरोप केला आहे. ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा कट रचला जात असून, यामागे आर्थिक गैरव्यवहार असल्याचा दावा राऊत यांनी केला. दिशाच्या वडिलांकडून आदित्य ठाकरेंना दिल्या जाणाऱ्या अब्रुनुकसानीच्या नोटिसीवरही त्यांनी तीव्र टीका केली.

दिशा सालियन प्रकरणाचं नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 11:24 AM

दिवंगत दिशा सालियन हिचे वडील मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरेंना अब्रूनुकसानीच्या दाव्याची नोटीस देणार आहे. दिशा सालियनच्या वडिलांच्या या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ही नौटंकी बंद करा. काही बेवडे आणि ऊर बडवे एकत्र आले आहेत. आमच्या विरोधात कटकारस्थान करत आहेत. या मागे नेपाळी कनेक्शन आहे, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील एका नेत्याचं नाव न घेता राऊत यांनी त्याचा उल्लेख नेपाळी असा केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना दिशा सालियन यांच्या वडिलांवर आणि त्यांना फूस देणाऱ्या नेत्यावर टीका केली आहे. ही नौटंकी बंद केली पाहिजे. ज्यांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला, त्यांनी ही नौटंकी बंद केली पाहिजे. कोणीही असेल. मी कुणाचं नाव घेत नाही. सीबीआयकडे तपास दिला आहे. कोर्टाने या प्रकरणात कोणीही आरोपी नसल्याचं म्हटलं आहे. या क्षणी कोणी आरोपी नाही. सीबीआयने अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

ठाकरे कुटुंबाविरोधात कटकारस्थान

या प्रकरणावर एका वाक्यात सांगतो, काही बेवडे आणि काही ऊर बडवे एकत्र आले आहेत. त्यांना नेपाळी कनेक्शनमधून पैसे येत आहेत. नेपाळी कनेक्शन समजून घ्या. तेच नेपाळी आमची बदनामी करत आहेत. ठाकरे कुटुंबाची बदनामी करत आहेत. पण ते यशस्वी होणार नाहीत. आमच्याविरोधात कटकारस्थान करत आहेत. बदनामीचा कट होत आहे. आमची बदनामी करण्यासाठी आर्थिक पुरवठा होत आहे. कुठे तेल तर कुठे अल्कोहोल वापरलं जात आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

शिंदेंपेक्षा मोदींचं मराठी उत्तम

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुजरातीत भाषण केलं होतं. त्यावरही राऊत यांनी टीका केलीय. अमित शाह आणि नरेंद्र मोदी त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचं हेडक्वॉर्टर हे गुजरातला आहे. त्यांच्या पक्षाचे पुढारी गुजराती आहेत. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी ते गुजरातीत बोलले असतील. अमित शाहांना उत्तम मराठी येतं. शाहांच्या पत्नी महाराष्ट्रातील आहे. मोदींना शिंदेंपेक्षा चांगलं मराठी येतं. तरीही शिंदे गुजरातीत बोलत असतील तर ते पक्षाच्या नेत्यांना खूश करत आहे हे समजून घ्या. गुजरातीत किंवा अन्य कोणत्या भाषेत बोलणं चूक नाही. पण त्यांच्या पक्षाची घटना गुजरातीत लिहिली आहे. त्यामुळे त्यामुळे ते लोक तिकडे जात आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

तर हा शिवरायांचा अपमान

मराठी बोलल्यामुळे नेतृत्त्व उजळत नाही, असं शिंदेंना वाटत असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचा अवमान आहे. वसंतदादा पाटलांना हिंदी येत नव्हतं. ते दिल्लीत मराठीतच बोलायचे. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण हे नेते हिंदी, मराठी इंग्रजी उत्तम बोलत. पण शिंदे गटाचा पक्षच गुजरातचा आहे. त्यामुळे त्यांना गुजरातीत बोलावसं वाटलं असेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us