ज्यांच्या सहीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या त्या कैलाश गायकवाड यांची ईडीकडून चौकशी

| Updated on: Sep 30, 2021 | 6:43 PM

पोलिसांच्या बदल्यांतून जमा करण्यात आलेल्या पैशाबाबतच्या मनी लाँड्रिंगचा तपास अजून सुरूच आहे. याच अनुषंगाने कैलाश गायकवाड यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

ज्यांच्या सहीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या त्या कैलाश गायकवाड यांची ईडीकडून चौकशी
ज्यांच्या सहीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या त्या कैलाश गायकवाड यांची ईडीकडून चौकशी
Follow us on

मुंबई : अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात कैलाश गायकवाड यांची गेल्या सात तासापासून चौकशी सुरू आहे. ईडीचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. कैलाश गायकवाड हे गृह विभागाचे उप सचिव आहेत. पोलिसांच्या बदल्यांमध्ये गैरप्रकार झाला आहे, असा आरोप आहे. या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास ईडीकडून सुरू आहे. (ED inquires about Kailash Gaikwad, whose signature is to be transferred)

कैलाश गायकवाड यांच्या सहीनेच निघत असतात बदल्यांचे आदेश

अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात एकूण तीन प्रकारे मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय आहे. पहिला प्रकार बार मालकाकडून पैसे आल्याचा, दुसरा प्रकार पोलिसांच्या बदल्यांमध्ये पैशाचा व्यवहार झाल्याचा आणि तिसरा मुद्दा आहे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैर प्रकार झाल्याचा. यातले पहिले दोन मुद्दे हे अनिल देशमुख यांच्याशी संबंधित आहेत. तिसरा मुद्दा परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित आहे. यामुळे सुरुवातीला बार मालकांच्या जबाबानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली. या दोघांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र ही दाखल केले आहे. यामुळे बार मालकाकडून गोळा केले गेलेल्या महिन्याला 100 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा तपास संपला आहे. मात्र, पोलिसांच्या बदल्यांतून जमा करण्यात आलेल्या पैशाबाबतच्या मनी लाँड्रिंगचा तपास अजून सुरूच आहे. याच अनुषंगाने कैलाश गायकवाड यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. गृह विभागामार्फत सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या केल्या जातात, त्या बदल्यांचे आदेश कैलाश गायकवाड यांच्या सहीने निघत असतात.

गेल्या तास तासांपासून सुरु आहे चौकशी

बदल्यांमध्ये नक्की कसा व्यवहार व्हायचा याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायची आहे. याचमुळे कैलाश गायकवाड यांना समन्स बजावून ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलावलं होतं. आज सकाळी बरोबर 10.30 वाजता कैलाश गायकवाड हे ईडी कार्यलयात दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांची चौकशी सुरु झाली असून अद्याप सुरूच आहे. गेल्या सात तासापासून ही चौकशी सुरू आहे. गृह विभागात बदल्यांची प्रक्रिया काय असते, बदल्या कशा केल्या जातात, या प्रक्रियेत कोणकोण अधिकारी सहभागी होत असतात, बदल्यांची अंतिम यादी कोण तयार करत, बदल्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची काय भूमिका असते, मंत्र्यांची काय भूमिका असते, बदल्यांचा अंतिम निर्णय कोण घेत असतं, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या मंत्री ढवळाढवळ करतात, आदी अनेक मुद्यांवर कैलाश गायकवाड यांच्याकडे चौकशी केली जात आहे. कैलाश गायकवाड यांची चौकशी अजून काही काळ चालण्याची शक्यता आहे. (ED inquires about Kailash Gaikwad, whose signature is to be transferred)

इतर बातम्या

प्रवाशांनो इकडं लक्ष द्या, मुंबई पुण्यातून सुटणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ, वाचा कोणत्या रेल्वेगाड्या सुरु राहणार?

आता पेट्रोल पंपावरही ई-वाहन चार्ज करता येणार, HPCL 5000 पंपांवर EV चार्जिंग स्टेशन उभारणार