500 कोटी हडपले? एकनाथ शिंदेंना ईडीचं समन्स पाठवा, बडा नेता आक्रमक; मागणीने खळबळ

मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या नावावर भाजपकडून पैसे घेतल्याचा दावा जरांगेंनी केला. यावर संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी शिंदेंना तातडीने समन्स बजावून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

500 कोटी हडपले? एकनाथ शिंदेंना ईडीचं समन्स पाठवा, बडा नेता आक्रमक; मागणीने खळबळ
Eknath Shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 12:08 PM

मनोज जरांगे पाटील यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला होता. एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांकडून माझ्या नावावर 500 कोटी रुपये घेतले. तशी भाजप नेत्यांमध्ये चर्चा आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. माझ्या नावावर शिंदे यांनी पैसे घेतले की नाही ते एकनाथ शिंदेंनी जाहीर करावं. दोन दिवसात त्यांनी यावर भाष्य करावं, असं आव्हानच जरांगे पाटील यांनी शिंदेंना दिलं होतं. जरांगे यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयने दखल घेतली पाहिजे. एकनाथ शिंदे यांना तातडीने समन्स बजावून या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीच संजय राऊत यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधातना ही मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप केला. त्यावर शिंदेंनी बोललं पाहिजे, असं आव्हानही जरांगेंनी दिलं होतं. दसरा मेळाव्याच्या सभेत उत्तर देण्यास सांगितलं होतं. शिंदेंनी भाजपकडून मला गप्प करण्यासाठी 500 कोटी घेतले, असं जरांगे म्हणतात. जो माणूस 500 कोटी रुपये भाजपकडून घेतो, त्या माणसाची लायकी काय आहे? तो कुणावर बोलतो? ठाकऱ्यांवर? रिजिम चेंजवर? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Loading...

याचा अर्थ मनी लॉन्ड्रिंग झालंय

500 कोटी घेतले आहेत. मग हे 500 कोटी कुठे गेले? पैसे देणारा तो भाजपचा नेता कोण? त्यावेळी 500 कोटी रुपये असणारा हा भाजपचा नेता कोण? मराठा समाजाचा आवाज बंद करण्यासाठी 500 कोटी रुपये देण्याचा प्रकार झाला. तो घृणास्पद आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या एका आरोपाने अनिल देशमुखांना अटक झाली होती. राज्याचे गृहमंत्री असलेल्या देशमुखांवर परमवीर सिंग यांनी 100 कोटींचा हवेतला आरोप केला होता. हा आरोप होताच ईडी आली होती. सीबीआय आली होती. इथे मनोज जरांगे पाटील हे जबाबदार व्यक्ती आहेत. जरांगेंनी आरोप केला आहे. शिंदेंनी भाजपकडून पैसे घेतले. याचा अर्थ मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. असं असेल तर ईडीने चौकशी केली पाहिजे. शिंदेंना समन्स पाठवलं पाहिजे. अनिल देशमुखांना समन्स पाठवलं गेलं. मग या 500 कोटीच्या आरोपावरून फडणवीस का शांत बसले आहेत? असा सवालही राऊत यांनी केला आहे.

मनोजदादा खोटं बोलत नाही

मी जरांगे पाटील यांना ओळखतो. मनोजदादा कधी खोटं बोलत नाहीत. एखाद्या शिवसैनिकांसारखं ते नेहमी खरे बोलतात. जे मनात आहे, ते थेट बोलतात. फडणवीस हे खरोखरच राज्याचे गृहमंत्री असतील, गृहमंत्री असल्याची त्यांना जाणीव असेल तर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडे प्रकरण दिलं पाहिजे. याची चौकशी केली पाहिजे. कुणाकडून पैसे घेतले आणि त्याचं काय झालं याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी करतानाच जरांगेंकडे जशी माहिती आहे. तशीच माझ्याकडेही आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

फडणवीस यांची चिंता वाटते

कुणीही आडवा आला तरी त्याचा नायनाट करून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार असल्याची गर्जना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल केली होती. त्यावरून राऊत यांनी भाजपला चांगलंच डिवचलं आहे. ही धमकी फडणवीस यांना दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोणत्या लेव्हलला बिश्नोईची गँग मंत्रिमंडळात काम करत आहे हे दिसून येतंय. ही गँग फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये असेल तर फडणवीस यांची सेक्युरिटी वाढवली पाहिजे. फडणवीस यांना केंद्रीय सुरक्षा दिली पाहिजे. जो आडवा येईल त्याचा नायनाट करण्याची भाषा सुरू आहे. कॅबिनेटमधील बिश्नोई गँगच्या मेंबरची ही भाषा आहे. मला फडणवीस यांची चिंता वाटते. ते का हतबल झाले आहेत? ते मुख्य बिश्नोईला घाबरले का? हे सर्व एप्रिलमध्ये जातील. यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर होईल, असा दावा त्यांनी केलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us