शिंदे-फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत भारी किस्सा, शपथविधीच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेते एकमेकांना काय बोलून गेले?

| Updated on: Feb 26, 2023 | 8:23 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज एकत्रित पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत एक भारी किस्सा झाला.

शिंदे-फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत भारी किस्सा, शपथविधीच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेते एकमेकांना काय बोलून गेले?
Follow us on

मुंबई : मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत एक भारी किस्सा झाला. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधत होते. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरुन अजित पवारांवर टीका करायला सुरुवात केली. पण त्याचवेळी एक किस्सा घडला. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यानंतर भर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

“अजित पवार हे एकनाथ शिंदे यांनी निष्ठा बदलली म्हणता. आता मी असं बोलू शकतो, अजित पवारांनी दिवसातून तीनवेळा म्हणजे देवेंद्र फडणवीसांची शपथ घेतली, नंतर राष्ट्रवादीत गेले. मी ते नाही केलं. मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे गेलो. अगदी सगळ्यांनी मान्य केलंय”, असं एकनाथ शिंदे म्हणत असतानाच उपमुख्यमंत्री म्हणाले, “आणि माझ्यासोबत घेतलेल्या शपथेवर तुम्ही कायम आहात”. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर भर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. त्यानंतर शिंदे यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर उत्तर दिलं.

एकनाथ शिंदे यांचं फडणवीसांना उत्तर

“मी कायमच असतो. एकदा निर्णय घेतला तर परत फिरत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये थोडं तरी माझं वजन आहे ना?”, असं एकनाख शिंदे म्हणाले. “अजित पवारांची परिस्थिती मी समजू शकतो. आरोप करताना पुरावा पाहिजे. अन्यथा आरोप कुणीही करु शकतो. आरोप करताना आपण मोठ्या पदावर राहिलेले आहात हे लक्षात ठेवलं पाहिजे”, असं एकनाथ शिंदे यांनी सुनावलं.

हे सुद्धा वाचा

“ते नेहमी सांगतात, शिवसेना सोडल्यानंतर काय होतं ते बघा, अरे आम्ही शिवसेनाच आहोत. आम्ही शिवसैनिकच आहोत. तुम्ही केव्हापासून निष्ठावंत कडवट शिवसैनिक झालात? याबातबत शोध लावा लागेल. आम्ही सभागृहात भेटूच. त्यामुळे सगळ्याचा समाचार तिकडे घेऊ”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांवर आणखी काय टीका केली?

“चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. खरंतर चहापानाच्या कार्यक्रमात विरोधकांनी आलं पाहिजे. सूचना केल्या पाहिजेत. विरोधकांची आज पत्रकार परिषद होती. त्यामध्ये त्यांची मानसिकता दिसलेली आहे. ते म्हणाले, चहापानावर बहिष्कार घातला. अजित पवार म्हणाले, चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. बरं झालं ते चहापानाच्या कार्यक्रमात सहभागी झाले नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“मी तर असं सांगतो, त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले. हसीना पारकर ही दाऊदची बहीण. तिला यांनी चेक दिलेत. ज्यांनी देशद्रोह केला त्यांचा राजीनामा घेण्याची त्यांनी हिंमत दाखवली नाही. बरं झालं! त्यांचे साथीदार अजित पवार आहेत. त्यांच्याबरोबर चहा पिणं टळलं. बरं झालं! महाराष्ट्रद्रोह मोठा की देशद्रोह मोठा?”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.