‘तुम्ही आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही’, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे यांचं सडेतोड उत्तर

"सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले. आणि तडजोड केली. तुम्हाला आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही", असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.

तुम्ही आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे यांचं सडेतोड उत्तर
| Updated on: Nov 24, 2022 | 6:31 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांच्याकडूनही लगेच सडेतोड उत्तर देण्यात आलं. “सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले. आणि तडजोड केली. तुम्हाला आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.

“छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार मोडूनतोडून टाकणाऱ्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे?”, असे सवाल मुख्यमंत्र्यांनी केले.

“कामाख्या देवीला जाणार हे मी जाहीरपणे सांगितलंय. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात आहोत. कुठल्याही मंदिरात जातो. आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. काही लोकं लपूनछपून करतात. त्यामुळे आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

“आत्मविश्वास होता म्हणून 50 आमदारांसह 13 खासदार माझ्याबरोबर आले. महाविकास आघाडीचं सरकार कुणाचं काम करत होतं? हे सरकार सर्वसामान्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही निर्माण केलंय”, असं शिंदे म्हणाले.

“तुम्ही हात दाखवायची भाषा करता, आम्ही हात 30 जूनला दाखवलेला आहे. चांगला हात दाखवलेला आहे. जे करतो ते निधड्या छातीने करतो. काही लपूनछापून करतात त्यांची काळजी करा”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.