
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणती घडामोड घडेल याचा काहीच भरोसा नाही. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई विमानतळावर गुप्त भेट झाली होती. या भेटीत दोघांमध्ये चर्चा होवून मुख्यमंत्री दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आलेली. पण नंतर दोन्ही नेते दिल्लीत गेले होते, अशी माहिती समोर आली. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडून आला. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्या घडामोडींनंतर आज संध्याकाळी शिंदे-फडणवीस यांच्याशी संबंधित अशाच काही घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेते उद्याच्या नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली होती. यासाठी एकनाथ शिंदे हे आज नागपुरात मुक्काम करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण नागपूर विमानतळावर आज पुन्हा शिंदे आणि फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे तडकाफडकी मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. ते अचानक मुंबईला रवाना का झाले? याबाबतची माहिती सध्या समजू शकलेली नाही.
दुसरीकडे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस सुरु असल्याची माहिती समोर आली. अजित पवार यांच्या सत्तेत येण्याने सगळी महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील, अशी चर्चा शिवसेना आमदारांमध्ये आहे. त्यामुळे अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात येऊ नये, अशीदेखील मागणी या आमदारांमध्ये असल्याची माहिती समोर आली. अजित पवार यांनी मविआ सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना निधी दिला नाही. त्यामुळेच आपण बंड पुकारलं, असं शिवसेना आमदारांचं म्हणणं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, शिवसेना आमदारांच्या तक्रारीचा सूर पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली. ही बैठक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या ‘रामटेक’ बंगल्यावर पार पडली. या बैठकीला मंत्री शंभूराजे देसाई, आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, खासदार भावना गवळी, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर या मंत्र्यांची आणि कोअर कमिटीची उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे.