सरकार शेतकर्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार देणार, पण त्यासाठी कुठले दोन हप्ते थकवले?
Ajit Navale on Farmers Aids Relief: सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी 5,000 रूपयांची अग्रीम मदत जाहीर केली. मदत निधीवरून विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांमधूनही नाराजीचा सूर आहे. शेतकरी नेत्यांनी तर आता वेगळाच दावा केला आहे.

Ajit Navale Criticized Mahayuti Government: यंदा दुष्काळाने तोंड वासले आहे. राज्यातील 305 तालुक्यावर दुष्काळाचा वरवंट फिरला आहे. दुष्काळी पंचनामे आणि इतर सोपास्कार पूर्ण होऊन केंद्र सरकारची मदत पोहचायला डिसेंबर उजडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकराने 5,000 रूपयांची अग्रीम रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची घोषणा केली. पण विरोधकांनी या मदतीवरून सरकारला धारेवर धरले आहे. इतकेच नाही तर महायुतीमधील घटक पक्षांनी सुद्धा नाराजी जाहीर केली आहे. तर आता शेतकरी नेत्यांनी वेगळाच दावा केल्याने विरोधकांच्या हाती आयता मुद्दा लागला आहे. सरकार खिंडीत गाठण्याचा मुद्दा त्यांना मिळाला आहे.
नमोचे हप्ते थकवले आणि पाच हजारांच्या मदतीची घोषणा
नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 4,000 थकवून, 5,000 रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच नाही तर मोठी फसवणूक असल्याची टीका शेतकरी नेते आणि संघटनांनी केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे चार हजार रुपयांचे दोन हप्त सरकारने थकविले आहेत, ते पैसे न देता आता दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रीम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही निव्वळ धूळफेक आहे, एका हाताने शेतकऱ्यांची मदत थांबवून ठेवायची आणि दुसर्या हाताने मदत दिल्याचा आव आणायचा, ही शेतकर्यांची फसवणूक आहे, असा आरोप शेतकरी संघटनांनी केली आहे.
कोणते दोन हप्ते थकवले?
किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेचे मार्च २०२५ आणि जून २०२६, हे हप्ते थकविले आहेत. आता रब्बी हंगामासाठीचा हप्ता देय आहे. एकीकडे यापूर्वी जाहीर केलेली चार हजार रुपयांची मदत थांबवून ठेवायची आणि दुसरीकडे दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा आग्रीम जाहीर करायचा, ही निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका अजित नवले यांनी केली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची अर्थसहाय्य करणारी योजना आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना 6,000 रूपये इतकी रक्कम देण्यात येते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये, प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धरतीवर ही योजना राबवली जात आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार असे एकूण 12 हजार रूपये देण्यात येतात. ज्या शेतकऱ्यांची नावं पीएम किसान योजनेत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी वेगळा अर्जफाटा करण्याची गरज नाही. मार्च 2026 मध्ये योजनेचा 8 वा हप्ता वितरीत करण्यात आला होता. आता उर्वरीत हप्ते दिवाळीत जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.