बँकेनं नाडलं, कर्जबाजारी शेतकरी अंत्यसंस्काराचं साहित्य घेऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

बँकेनं नाडलं, कर्जबाजारी शेतकरी अंत्यसंस्काराचं साहित्य घेऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारने सरसकट शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख कर्जमाफी दिली. मात्र, यानंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी संपण्याची चिन्ह नाही.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Dec 26, 2019 | 8:27 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारने सरसकट शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख कर्जमाफी दिली. मात्र, यानंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी संपण्याची चिन्ह नाही. नांदेडमधील एक शेतकरी डोक्यावर 17 लाख रुपयांचं कर्ज असताना बँकेने नाडल्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आला (Farmer Dhanaji Jadhav meet CM Thackeray). धनाजी वसंतराव जाधव असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या कर्जबाजारी शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येताना सोबत अंत्यसंस्काराचं साहित्यही आणल्यानं याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली आहे (Farmer Dhanaji Jadhav meet CM Thackeray).

शेतकरी धनाजी वसंतराव जाधव यांच्यावर आयडीबीआय बँकेचं 17 लाख रुपयांचं कर्ज झालंय. विशेष म्हणजे बँकेने 17 लाखांच्या कर्जापोटी शेतकऱ्याची तब्बल 1 कोटी 50 लाख रुपये किमतीची जमीन ओलीस ठेवल्याचा आरोप धनाजी जाधव यांनी केला आहे. जमीन विकून बँकेचं कर्ज फेडण्याची इच्छा आहे. पण बँक ना जमीन विकू देतंय, ना जमिनीची कागदपत्रं देतंय, अशी तक्रार शेतकरी जाधव यांनी केली.

धनाजी जाधव यांचे वडील मध्यंतरीच्या काळात कॅन्सरनं वारले. त्यांच्या औषधोपचारात ते अगदी कर्जबाजारी झाले. हातउसणे घेतलेल्या पैशांसाठी त्यांच्यामागे अनेकांनी तगादा लावला. त्यातच मुलगा 10 वीच्या वर्गात शिकत होता. अशा परिस्थितीत जाधव यांनी आयुष्याचा शेवट करण्याआधी अखेरचा मार्ग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय घेतला.

बँकेच्या चकरा मारून आणि वाढतं कर्ज चुकवता न आल्याने हताश धनाजी जाधव मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यास आत्महत्या करण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत अंत्यसंस्कारांचं सामानही आणलं होतं. मात्र, मंत्रालयात आल्यावर जाधव यांना मुख्यमंत्री इथं न येता आज थेट सह्याद्रीवर जातील असं सांगण्यात आलं. त्यामुळे हताश होऊन त्यांनी टीव्ही 9 मराठीकडे मदतीचा हात मागितला. यानंतर काही क्षणातच टीव्ही 9 मराठीची टीम संबंधित शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पोहचली. यावेळी टीव्ही 9 मराठीने शेतकऱ्याची व्यथा जाणून घेत त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेटही घडवून आणली. या सर्व भेटीत शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

शेतकरी धनाजी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्या अडचणी समजून घेत तात्काळ नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन जाधव यांचा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले. धनाजी जाधव मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाताना त्यांच्यासोबत काही सामान होतं. त्यात पोलिसांना आत्महत्या करण्याचं साहित्य आढळलं. त्यानंतर ही माहिती मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनाही देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला विश्वास देत त्याची व्यथा समजून घेतली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याच्या हालाखीच्या परिस्थितीची माहिती मिळताच आपल्या पूर्वनियोजित बैठका थांबवल्या. तसेच तात्काळ शेतकरी जाधव यांना भेटीसाठी बोलावलं. भेट होण्याआधी खचलेले धनाजी जाधव भेटीनंतर मात्र आनंदाने घरी परतले. यावेळी त्यांनी हे बळीराजाचं सरकार असल्याचं मतही व्यक्त केलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें