फटाक्यांमुळे राज्यभरात आगीच्या घटना, कोट्यवधींचं नुकसान

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : दिवाळीला फोडलेल्या फटाक्यांमुळे राज्यात विविध ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळालं. मुंबईतील अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, काल दिवसभर आग विझवण्यासाठी फोन येत होते. मुंबईसह राज्यभरात या घटना घडल्या, ज्यामुळे कुठे घर जळालं, तर कुठे गोदामं आणि कंपन्या जळाल्या. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नसली तरी मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं. वर्ध्यात अग्नितांडव वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे स्टेशन […]

फटाक्यांमुळे राज्यभरात आगीच्या घटना, कोट्यवधींचं नुकसान
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : दिवाळीला फोडलेल्या फटाक्यांमुळे राज्यात विविध ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळालं. मुंबईतील अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, काल दिवसभर आग विझवण्यासाठी फोन येत होते. मुंबईसह राज्यभरात या घटना घडल्या, ज्यामुळे कुठे घर जळालं, तर कुठे गोदामं आणि कंपन्या जळाल्या. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नसली तरी मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं.

वर्ध्यात अग्नितांडव

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे स्टेशन चौक परिसरात रात्रीच्या दरम्यान दुकान चाळीला आग लागल्याने मोठं नुकसान झालं. या अग्नितांडवात हार्डवेअरची पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. दुकानाशोजरी असलेल्या घरानेही पेट घेतला. आग लागलेली दुकाने ही हार्डवेअरची असल्याने दुकानात पेंट, लिक्विड ऑईलमुळे आगीने जास्त पेट घेतला. रात्री लागलेली ही आग सकाळपर्यंत धुमसत होती. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

वसईत 60-70 गोडाऊन जळून खाक

वसईतही रात्री भीषण आग लागल्याने एकच खळबळ माजली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसईच्या तुंगारेश्वर फाट्या जवळील 60 ते 70 गोडाऊन जळून खाक झाली. ही सर्व प्लास्टिक आणि भंगाराची गोडाऊन होती. रात्री दीडच्या सुमारास ही आग लागली. रात्रीची वेळ असल्याने या परीसरात शुकशुकाट होता. त्यामुळे आग ही आजूबाजूला पसरत गेली. आगीत भंगाराची ने-आण करणाऱ्या गाड्याही जळून खाक झाल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विरार स्टेशन भागात गॅरेजला आग

विरार येथे स्टेशन परिसरात गॅरेजमध्ये आग लागल्याने तीन दुकाने जळून खाक झाली. शॉर्टसर्किटने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत यादव गॅरेज, न्यू एकता सर्व्हिस सेंटर आणि सृष्टी हॉटेल जाळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आगीची घटना

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सिंधुदुर्गात भीषण आग लागल्याने कणकवली-ओसरगाव येथील एका गोडाऊनमध्ये आगीने रौद्र रूप घेतलं. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीचे हे गोडाऊन होतं. आगीचं कारण अस्पष्ट असून जवळपास अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. आगीत 500 पेक्षा अधिक टायर आणि पाच हजार लिटर इंजिन ऑईल जळून भस्मसात झालं. पाच कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.