आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं

| Updated on: Sep 29, 2022 | 9:19 PM

सर्वात आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सोडविला गेला पाहिजे.

आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा, नंतर चिन्हाची लढाई, अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं
अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं
Image Credit source: t v 9
Follow us on

Tv 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : उच्च न्यायालयात लढाई सुरू झाली आहे. ही लढाई 16 सदस्यांच्या अपात्रतेची आहे. 16 सदस्यांच्या बाबतीत निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षाविषयी चर्चा होऊ शकते, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. सदस्यांच्या अपात्रतेसाठी अर्ज विधानसभेच्या अध्यक्षांकडं सादर करण्यात आलंय. ते लोकं शिवसेनेविषयी कसं लढू शकतात, हा तांत्रिक मुद्दा आहे, असं ते म्हणाले.

सर्वात आधी 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सोडविला गेला पाहिजे. याचा निकाल आधी लागू द्या. नंतर शिवसेना पक्षाच्या चिन्हाविषयी चर्चा होऊ शकते. या सगळ्या बाबी कायदेशीर दृष्या समोर येईल.त्याशिवाय निवडणूक आयोग काही निर्णय घेईल, असं मला वाटतं नाही, असं दानवे यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना ही जनतेची ताकद आहे. त्यासाठी कोणतंही प्लॅन करण्याची गरज नाही. पहिला आशीर्वाद हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाचं असेल. आई, बाप यांच्या विरोधात लढणारे हे गद्दार आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भाजपनं केलंय. हे भाजपचं पाप राज्यातील जनता कदापि सहन करणार नाही, असंही दानवे म्हणाले.

मिंध्या शिवसेनेसोबत किती लोकं गेले हे आम्हाला माहीत आहे. आम्ही ठाण्यात जाऊन आलो. लाभार्थी, कंत्राटदार, धनदांडगे लोकं हे त्यांच्यासोबत गेले. बाकी सामान्य कार्यकर्ता हा खऱ्या शिवसेनेसोबत आहे.

रश्मी ठाकरे या ठाण्यात गेल्या. देवीचं दर्शन त्यांनी घेतलं. यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीसोबत आले होते. तेव्हा त्यांनी पक्षांतर्गत विरोध नोंदवायला पाहिजे होता. पण, तसा त्यांनी विरोध केला नाही. त्यामुळं त्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे आता स्पष्ट होत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

शिवसेनेचा मेळावा हा शक्तिप्रदर्शनाचा भाग नसतो. हा विचाराचं सोनं लुटण्याचा प्रसंग आहे. उद्धव ठाकरे हे विचाराचं सोनं लुटतील. हे त्यांचे विचार राज्यालाच नव्हे तर देशाला मार्गदर्शक असं असेल, असंही दानवे यांनी सांगितलं.