झिरवाळ यांना बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असू शकतं, काँग्रेसच्या महिला नेत्याचा बॉम्ब; राज्यात मोठी खळबळ
Narhari Zirwal : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी धाड टाकत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला 50 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. यावर आता काँग्रेसच्या एका महिला नेत्याने भाष्य केले आहे.

मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी धाड टाकत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला 50 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यावर आता काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत खळबळजनक दावा केला आहे. ही कारवाई भाजपचे हे षड्यंत्र असू शकते, याद्वारे मंत्री नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याचा डाव असू शकतो असं ठाकूर यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नरहरी झिळवाळ यांना बदनाम करण्याचे भाजपच षडयंत्र असू शकतं…
एका परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील काही पैसे स्वीकारताना या लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यावर बोलताना यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, ‘हे टक्केवारीचे सरकार आहे तर नरहरी झिळवाळ यांना बदनाम करण्याचे भाजपच षडयंत्र असू शकतं.’
प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितली जाते…
पुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या की, आता मंत्रालयामध्ये याच गोष्टी चालू आहे. कुठल्याही ऑफिसमध्ये जा टक्केवारी टक्केवारीचा हिशोब आहे. आता ते उघड झालं आहे. प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितली जाते. हे टक्केवारीचे सरकार हे आहे अशी टीकाही यावेळी ठाकूर यांनी सरकारवर केली आहे.
भाजपाने देशाला विकलं आहे – ठाकूर
यशोमती ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘भाजपाने देशाला विकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात पण साधी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकत नाही. महिलांच्या आड लपण्याचा प्रयत्न मोदी करतात या देशाचं राजकीय वगळ वेगळ्या स्वरूपामध्ये जात आहे या गोष्टीचा निषेध आहे. एपस्टीन फाईलमध्ये भाजपचे मंत्री हरदीप पुरी यांचं नाव आढळले आहे. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
झिरवाळ यांचे कार्यालय सील
दरम्यान, एसीबीने नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय सील केले आहे. या लाचेच्या व्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या लिपिकाने सुरुवातीच्या चौकशीत काही धक्कादायक नावे घेतल्याची चर्चा आहे. ज्यामुळे मंत्र्यांचे खासगी सचिवही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे बोललं जात आहे.
