Bademiya Restaurant Mumbai | ‘त्या’ घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाची आणखी एका बड्या हॉटेलमध्ये धाड, मालकाला नोटीस

मुंबईतल्या पापा पान्चो रेस्टॉरंटमध्ये चिकनच्या थाळीत उंदिराचं पिल्लू आढळल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन चांगलंच कामाला लागलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज Bademiya या मोठ्या हॉटेलमध्ये धाड टाकली. यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला.

Bademiya Restaurant Mumbai | त्या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाची आणखी एका बड्या हॉटेलमध्ये धाड, मालकाला नोटीस
संबंधित फोटो हा वांद्रे येथील हॉटेलचा आहे. या हॉटेलमधील प्रकार समोर आल्यानंतर आज बडेमिया हॉटेलमध्ये धाड टाकण्यात आली. एफडीएच्या रडारवर अशा अनेक बड्या हॉटेल्स आहेत.
| Updated on: Sep 15, 2023 | 1:56 PM

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये चिकनच्या थाळीत उंदराचं मेलेलं पिल्लू सापडल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता बाह्या सरसावल्या आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये धाड टाकण्यास सुरुवात केलीय. सर्वसामान्य नागरीक, विविध देशातून येणारे प्रवासी मोठ्या विश्वासाने मुंबईतील प्रसिद्ध आणि ख्यातनाम हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी जातात. पण या हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात घाणीचं सम्राज्य असणं अपेक्षित नाही. कारण त्यामुळे स्वयंपाकघरात उंदीर आणि झुरळ यांचा वावर वाढतो. त्यातून अन्नपदार्थांमध्ये विषबाधा होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे नुकतंच मुंबईतल्या नामांकीत अशा पापा पान्चो रेस्टॉरंटमध्ये एक जोडपं जेवणासाठी गेलं होतं. त्यांनी रोटी, चिकन आणि मटण थाळी ऑर्डर केली होती. यावेळी जेवताना त्यांना एक मासांचा तुकडा दिसला. हा तुकडा चिकनच्या मासांच्या तुकड्यापेक्षा वेगळा होता. त्यांनी निरखून पाहिलं तर ते छोटं उंदिराचं मेलेलं पिल्लू होतं असं निदर्शनास आलं. ज्यांनी ऑर्डर केली होती त्यांची तर पायाखालची जमीनच सरकरली. त्यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

FDA अ‍ॅक्शन मोडवर

संबंधित प्रकार अतिशय धक्कादायक, संतापजनक आणि किळसवाणा असा आहे. या प्रकरणाची गंभीर दखल अन्न आणि औषध प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आता मुंबईतील मोठमोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये धाड टाकली जात आहे. फक्त हायफाय हॉटेल्सच नाही तर छोट्या-मोठ्या हॉटेल्सवरही अन्न आणि औषध प्रशासनाची आता करडी नजर आहे.

अधिकाऱ्यांची धाड, धक्कादायक माहिती समोर

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबंईतील बडेमिया या नामांकीत हॉटेलमध्ये धाड टाकली. यावेळी त्यांना या हॉटेलच्या एका स्वयंपाकघराबाबत परवाना नसल्याचं निदर्शनास आलं. संबंधित हॉटेल FSSIA च्या परवानगी शिवाय जेवण दिलं जात असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. विशेष म्हणजे हॉटेलच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता, झुरळ आणि उंदिर आढळले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

हॉटेल मालकाला व्यावसाय बंद करण्याची नोटीस

अधिकाऱ्यांनी काही खाद्य पदार्थांना पॅक करुन जप्त देखील केलंय. या खाद्य पदार्थांची आता प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे. काही चुकीच्या गोष्टी आढळ्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच अन्न  आणि औषध प्रशासनाने या हॉटेलला व्यावसाय बंद करण्याबाबतची नोटीसदेखील दिल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे हे हॉटेल 75 वर्षांपेक्षा जुनं हॉटेल आहे. या हॉटेलला आता टाळं ठोकण्यात आलं आहे.