
सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. त्यातच मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या विविध रेल्वे आणि बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी झुंबड पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना होत आहेत. गणेशोत्सवादरम्यान आपल्या गावी जाण्यासाठी कोकणवासियांनी रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांवर मोठी गर्दी केली आहे. यामुळे अनेकांनी लालपरीला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकणात जाण्यासाठी बाप्पाच्या आगमनासाठी अनेकांनी लालपरी म्हणजे एसटी बसला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. दिवा, कुर्ला टर्मिनस, ठाणे आणि स्वारगेट (पुणे) यांसारख्या प्रमुख ठिकाणी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः कुर्ला नेहरूनगर एसटी आगारात कोकणातील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटेत अडथळे आले आहेत. कोकणात जाणारी मडगाव मांडवी एक्सप्रेस सध्या उशिराने धावत आहेत. यामुळे ठाणे रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तांत्रिक कारणांमुळे ही गाडी उशिरा पोहोचत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तर दुसरीकडे कुर्ला टर्मिनसवरून सावंतवाडीसाठी दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. स्वारगेट बस स्थानकावरही कोकणात जाणाऱ्या बसमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी कोकण आणि मुंबईचं एक वेगळं नातं आहे. परशुराम घाटातून मोठ्या संख्येने गाड्या जात आहेत. सुदैवाने महामार्गाच्या रुंदीकरणामुळे इथे वाहतूक कोंडीची समस्या नाही. पावसाळ्यातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेत कोकणवासीय आपल्या गावी पोहोचताना दिसत आहेत.
पुणे शहरात गणेशोत्सवानिमित्त मध्यवर्ती भागात होणारी गर्दी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक विभागाने केलं आहे. २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना गाडगीळ पुतळा चौकातून संताजी घोरपडे पथ, कुंभाखेस चौक मार्गे प्रवास करता येईल. तसेच शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्यांनी जंगली महाराज रोडमार्गे जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच पुणे आणि आसपासच्या गावांमधून शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी पीएमपीने २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात रात्रीच्या वेळेत अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात एकूण ७८८ जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. रात्री १२ नंतर चालणाऱ्या बसेससाठी नेहमीच्या तिकीट दरापेक्षा १० रुपये जादा आकारले जातील. तसेच, रात्री १२ नंतर बस पास ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.