Chhath Puja 2026: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गिरगाव चौपाटीवर छटपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय
No Chhath Puja at Mumbai Girgaon Chowpatty: उद्या गिरगाव चौपाटीवर छटपूजा होणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परिसरात सूचना फलक लावण्यात आले आहेत.

उद्या गिरगाव चौपाटी या ठिकाणी छटपूजा करता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उद्या गिरगाव चौपाटी या ठिकाणी छटपूजा साजरी केली जाणार नाही. यासाठी गिरगाव चौपाटी या ठिकाणी सूचनाफलक देखील लावण्यात आलेले आहेत. गिरगाव चौपाटी सार्वजनिक ठिकाण असून या ठिकाणी फटाके फोडू नये. तसेच अस्वच्छता करू नये, अशा आशयाचे फलक लागले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे छठ पूजा आयोजित करण्यास परवानगी नाकारली आहे. न्यायालयाने या संदर्भातील एक याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, भारत हा विविध धर्मांचा देश असून येथे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी, हे स्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांच्या अधीन आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याने चौपाटीवर मंच उभारण्यास आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी नाकारली होती. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले.
17 सप्टेंबर 2026 रोजी डीबी मार्ग पोलिसांनी छठ पूजा आयोजित करण्यास परवानगी नाकारली. पोलिसांनी असा युक्तिवाद केला की, 1998 च्या एका पूर्वीच्या प्रकरणात, उच्च न्यायालयाने गिरगाव चौपाटीवर काही विशिष्ट सणांव्यतिरिक्त (गणेशोत्सव, नवरात्री, रामलीला, कृष्णलीला आणि ख्रिसमस) इतर कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई केली होती. त्यानंतर, मिथिला छठ पूजा संघाने नोव्हेंबर 2026 च्या पहिल्या आठवड्यात, 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी गिरगाव चौपाटीवर छठ पूजा आयोजित करण्याची परवानगी मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली.
9 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने संघाला छठ पूजेसाठी दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयात राज्य सरकारने आदर्श चौपाटी प्रगती मंडळ प्रकरणातील न्यायालयाच्या 2018 च्या निर्णयाचा दाखला दिला. उच्च न्यायालयाने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आधीच मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला माहिती दिली की, परवानगी मागण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर करण्यात आले होते. सध्या मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने गिरगाव चौपाटीवर छठ पूजा आयोजित करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.