
Google India: मुंबईतील गूगल कार्यालयाची जागा बदलणार नाही. वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) मध्ये असणारे गूगलचे कार्यालय त्याच ठिकाणी असणार आहे. महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने पुन्हा एकदा बीकेसीवर भर दिल्यानंतर गूगलने कार्यालयची जागा न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील पाच वर्षांसाठी गूगलने बीकेसीमधील कार्यालयाचे कराराचे नूतनीकरण केले आहे. बीकेसी-वरळी मेट्रो कॉरिडोर काही दिवसांत सुरु होणार असताना गूगलने हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसीमध्ये स्टार्टअपची समिट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप इंडियाला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही समिट घेतली होती. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी बीकेसीला इनोव्हेशन सिटी बनवण्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती.
गूगल इंडियाने मुंबईतील बीकेसीमध्ये 304 कोटी रुपयांमध्ये पाच वर्षांसाठी जागा भाड्याने घेण्याचा करार केला आहे. स्क्वायरयार्ड्सने गूगल इंडिया प्राइव्हेट लिमिटेड आणि गूगल क्लाउड इंडिया प्राइव्हेट लिमिटेडच्या कार्यालयांचे नूतनीकरण झाल्याची माहिती दिली. गूगल इंडिया प्राइव्हेट लिमिटेडने बीकेसीमधील 1.11 लाख चौरस फूट कार्यालयीन जागेसाठी 3.55 कोटी रुपये प्रति महिना भाड्याने कराराचे नूतनीकरण केले आहे. तर गुगल क्लाउड इंडियाने बीकेसी, मुंबई येथील कार्यालयाच्या जागेसाठी दरमहा रु. 1.24 कोटी भाडेपट्ट्याचे नूतनीकरण केले आहे.
गूगलची दोन्ही कार्यालये वांद्रे कुर्ला संकुलामधील फर्स्ट इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरमध्ये आहेत. गूगलची भारतातील अनेक शहरांमध्ये कार्यालये आहेत. यामध्ये गुरुग्राम आणि हैदराबादचाही समावेश आहे. बीएफएसआय क्षेत्र आणि फॉर्च्यून 500 कंपन्यांचे हे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणी जिओ, एप्पल, नेटफ्लिक्स, फेसबुक, अमेजन, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, वीवर्क, सिस्को, फायजर, स्पॉटिफाई यांची कार्यालये आहे.
अमेरिकन दुतावासचे कार्यालय बीकेसीत आहे. तसेच बीकेसीमध्ये स्थानिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणारे मॉल्स आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे.