
मुंबईत गेले काही दिवस आकाशात आग ओकणाऱ्या सुर्याच्या तोंडावर कोणीतरी मास्क लावल्यासारखा ढगांचा आणि ऊन सावल्यांचा खेळ सुरु होता. त्यामुळे एप्रिल महिन्यातील हीट थोडी मे महिन्या सुरुवातीला कमी झाली होती. परंतू राज्यात काल परवा इतरत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मुंबईतीत वातावरण थोडेसे हायसे झाले होते. परंतू सोमवारी दुपारी अचानक अंधारुन येऊन मुंबईचे आकाश कधी नव्हे ते धुळीने लालबुंद आणि मातकट दिसू लागले. डोळ्यात धुळीचे कण जाऊ लागले. अशा वातावरणाची सवय नसल्याने मुंबईकर घराबाहेर, कार्यालयाबाहेर येऊन या धुळीच्या वादळाचा अदमास घेऊ लागले. अचानक धुळीचे लोट वाहू लागल्याने अनेक जणांनी आपल्या मोबाईलमध्ये धुळीच्या वातावरणाची छबी आणि व्हिडीओ घेतले. वादळी वाऱ्यांनी मुंबईकरांच्या उरात धडकी भरु लागली. आणि अपघात झाल्याच्या बातम्या देखील धडकू लागल्याने या आनंदावर विरजण पडले.
मुंबईतील धुळीचे लोट पाहून आणि आभाळाला आलेला मातीचा रंग पाहून हैराण व्हायला झाले. इतके दिवस आपण धुळीची वादळं दुबईत होत असल्याचे ऐकूण किंवा काही जणांनी स्वत: अनुभवलेली देखील असतील. मुंबईत असे धुळीचे वादळ पहिल्यांदा अनुभवायाला मिळाले. या धुळीच्या वादळाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. लोअर परळ येथील उत्तुंग इमारतीवरुन हा व्हिडीओ चित्रित केला असावा असे वाटत आहे. या व्हिडीओत धुळीचे लोट अगदी आभाळात गेल्याचे दिसत आहे. आणि मुंबईच्या गगनचुंबी इमारतीमध्ये हे वादळ घोंघावताना दिसत आहे. या व्हिडीओला समाजमाध्यमावर खुप पाहीले जात आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
#DustStorm over Lower Parel. #MumbaiRains pic.twitter.com/eVBz2JUsrP
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) May 13, 2024
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी सायंकाळी अचानक धुळीचे वादळ आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतू या जोरदार हवेमुळे अनेक भागात अपघातांची मालिका घडली. घाटकोपर परिसरातील छेडा नगरात होर्डिंग कोसळून भीषण अपघात घडला. रेल्वे शेजारी मोठे जाहीरातीचे होर्डींग्ज रेल्वे जवळील पेट्रोल पंपावर कोसळून शंभरजण गाडले गेले. या प्रकरणानंतर वडाळा येथील श्री जी टॉवर येथे देखील 14 मजली मेटल कार पार्कीग टॉवरचे बांधकाम सुरु असताना तो कोसळुन 50 गाड्यांचे नुकसान झाले. तर मध्य आणि हार्बर मार्गावर लोकल सेवेचा विचका झाला.