Why I Killed Gandhi: भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले?; शरद पवारांचा बोचरा सवाल

| Updated on: Jan 21, 2022 | 2:13 PM

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे वादंग उठलं आहे.

Why I Killed Gandhi: भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले?; शरद पवारांचा बोचरा सवाल
शरद पवार पवारांनी सांगतला कोरोना काळातील ट्रेनचा किस्सा
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे वादंग उठलं आहे. भाजपनेही यावरून अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. भाजपच्या या टीकेची राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले?, असा बोचरा सवाल शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. भाजपनेही अमोल कोल्हेंवर टीका केली आहे, याकडे पवारांचं मीडियाने लक्ष वेधलं. त्यावर, भाजप गांधीवादी कधीपासून झाले? भाजप आणि संघाच्या इतिहासावर मी भाष्य करू शकत नाही. एकेकाळी गांधीविरोधात वेगळी भूमिका घेणाऱ्या शक्ती आता नक्की कुठे आहेत हे पाहिलं पाहिजे., असं पवार म्हणाले.

आव्हाडांनी त्यांचं मत मांडलं

अमोल कोल्हे यांच्या सिनेमाला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. त्याबाबतही पवारांना विचारलं असता आव्हाडांनी त्यांचं मत मांडलं आहे, असं पवार म्हणाले.

म्हणून कलाकार औरंगजेब, रावण ठरत नाही

गांधी सिनेमातही कुणी तरी गोडसेची भूमिका साकारली होती. पण भूमिका करणारा व्यक्ती कलावंत होता. तो गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला. शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका घेत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो. किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही. तो कलाकार असतो. सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही. रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असं पवार म्हणाले.

कोल्हेंशी बोलणं नाही

अमोल कोल्हेंनी गोडसेची भूमिका साकारली असेल तर ती कलावंत म्हणून केली आहे. त्याकडे कलाकार म्हणूनच पाहिलं पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या विषयावर अमोल कोल्हे यांच्याशी बोलणं झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच कलावंत म्हणून मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो. कलावंत म्हणूनच त्यांनी ती भूमिका साकारली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसे साकारला असेल तर गांधीविरोधक ठरत नाही, शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे नथुराम गोडसे साकारणार; राजेश टोपे म्हणतात…

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम 14 दिवसांनी वाढला