‘तेजस’ने प्रवास करताना घरी चोरी झाल्यासही नुकसान भरपाई

| Updated on: Jan 06, 2020 | 10:50 AM

तेजस एक्स्प्रेसचं वैशिष्ट्य म्हणजे, प्रवासादरम्यान प्रवाशाच्या घरी चोरी झाल्यास प्रवाशाला एक लाखापर्यंतची नुकसान भरपाई मिळणार आहे.

तेजसने प्रवास करताना घरी चोरी झाल्यासही नुकसान भरपाई
Follow us on

मुंबई : अहमदाबाद-मुंबईदरम्यान येत्या 17 जानेवारीपासून तेजस एक्स्प्रेस धावणार आहे (Tejas Express). इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (IRCTC) ही खासगी गाडी चालवली जाणार आहे. या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही खास सोयी-सुविधा देण्यात येणार आहे. तेजस एक्स्प्रेसचं वैशिष्ट्य म्हणजे, प्रवासादरम्यान प्रवाशाच्या घरी चोरी झाल्यास प्रवाशाला एक लाखापर्यंतची नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच, प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने विमा संरक्षणचीही तरतूद केली आहे (IRCTC Home Theft Insurance).

विमा कंपनी देणार भरपाई (IRCTC Home Theft Insurance)

आयआरसीटीसीद्वारे चालवण्यात येणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये तिकीट बुक केल्यानंतर प्रवाशाला विमा कंपनीकडून एक मेल येईल. यामध्ये प्रवासादरम्यानचे सर्व नियम आणि अटी लिहिलेल्या असतील. आयआरसीटीसीनुसार, जर प्रवाशाच्या घरी प्रवासादरम्यान एक लाखापर्यंतची चोरी झाली, तर विमा कंपनी त्याची भरपाई करेल. यासाठी प्रवाशाला विमा कंपनीला एफआयआरची एक प्रत द्यावी लागेल. त्यानंतर विमा कंपनीच्या चौकशीनंतर ही भरपाई प्रवाशाला मिळेल.

गाडीला उशिर झाल्यासही भरपाई मिळणार

तेजस एक्स्प्रेसला उशिर झाल्यासही प्रवाशांना भरपाई देण्यात येईल, असा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. दिल्ली-लखनऊदरम्यान चालवण्यात येणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. तेजस एक्स्प्रेसला जर एक तास उशिर झाला, तर प्रवाशांना 100 रुपये भरपाई मिळेल, तसेच जर दोन तास उशिर झाला तर प्रवाशांना 250 रुपये भरपाई मिळेल.

तेजस एक्स्प्रेसमध्ये एकूण 758 जागा आहेत. यापैकी 56 जागा या एग्झिक्युटीव्ह क्लाससाठी आरक्षित असतील, तर इतर जागा एसी चेअर क्लास असतील. या गाडीतील प्रवाशांचा 25 लाख रुपयांचा प्रवासी विमाही काढला जाईल.

विदेशातील नियमांपासून प्रेरणा

भारतात रेल्वे गाड्यांना उशिर होणे हे सामान्य आहे. मात्र, विदेशात असं होत नाही. जापानमध्ये रेल्वेला उशिर झाल्यास रेल्वे कंपनी प्रवाशांसाठी एक प्रमाणपत्र जारी करते. हे प्रमाणपत्र ते ऑफीस, शाळा, विद्यापीठ परिक्षेत उशिरा पोहोचण्याचं कारण म्हणून दाखवू शकतात. हे प्रमाणपत्र गाडीला 5 मिनिटे उशिर झाला तरी जारी करण्यात येतं.

पॅरिसमध्येही अशा प्रकारचं प्रमाणपत्र जारी केलं जातं. तर ब्रिटनमध्ये गाडीला उशिर झाल्यास किंवा गाडी रद्द झाल्यास सर्व प्रवाशांना भरपाई दिली जाते. नॉर्वे आणि फिनलँडमध्ये जर गाडीला अर्ध्या तासापेक्षा जास्त उशिर झाला तर प्रवाशांना तिकीट भाड्याच्या 50 टक्के रक्कम भरपाई म्हणून दिली जाते.