मुंबईतील इर्ल्यात ‘अदृश्य’ पोलीस स्टेशन

मुंबईतील इर्ल्यात 'अदृश्य' पोलीस स्टेशन
Maharashtra Police Bharti 2019

मुंबई : मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र त्या अनुशंगाने गुन्हेगारीही वाढत आहे. त्यामुळे पोलीस आणि पोलीस ठाण्यांची संख्याही वाढविणे अत्यंत गरजेचं आहे. मात्र तरीही मुंबईत इर्ला या नावाने पोलीस स्टेशनला मंजुरी मिळून जवळपास 10 वर्षे उलटले आहेत. मात्र अजूनही इर्ला नावाचं पोलीस स्टेशन अस्तित्वात आले नाही. ते फक्त कागदावरच आहे.

मुंबईत पोलीस स्टेशनची संख्या जास्त व्हावी आणि सुरक्षाव्यवस्था चांगली असावी म्हणून सांताक्रुझ आणि जुहू पोलीस ठाणे विभागून इर्ला पोलिस ठाण्याला दहा वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. 2012 साली त्याबाबत अधिसूचना काढून हद्दही ठरवण्यात आली. 2015 साली 20 अधिकारी आणि 29 कर्मचारी यांची नेमणूकही झाली. मात्र पोलीस ठाण्यासाठी इमारतच नसल्याने हे अधिकारी जुहू आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात बसून काम करीत आहेत. पर्यायाने, दहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेला इर्ला पोलीस स्टेशन आजतागायत अस्तित्वातच आलेला नाही.

मुंबईत एकूण 94 पोलीस ठाणे आहेत. मुंबईची लोकसंख्या वाढत असल्याने गुन्हे रोखण्यासाठी 2001 साली  परिमंडळ नऊच्या तत्कालीन पोलिस उपायुक्तांनी विलेपार्ले पश्चिमेला सांताक्रूझ आणि जुहू पोलिस ठाण्यासह आणखी एका पोलिस ठाण्याची गरज असल्याकडे पोलिस आयुक्तांचे लक्ष वेधले. पोलिस आयुक्तांनी हा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला. सात ते आठ वर्षांनंतर मुंबई पोलिस दलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सव्वा तीन हजार पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. यातूनच इर्ला पोलिस ठाण्यालाही मनुष्यबळ देण्यास हिरवा कंदील देण्यात आला पण 10 वर्ष उलटले तरी काहीच झालेला नाही. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. कारण गृह खाते त्यांच्याकडेच असून राजकीय इच्छाशक्ती नाही असेच एकंदरीत दिसून येत आहे.

इर्ला पोलीस स्टेशनसाठी मंजुरी अधिसूचना सर्व काही झालं असून, पोलीस ठाण्याच्या स्टाफही आहे. मात्र स्वीकृत पोलीस स्टाफमधील जास्त संख्या संताक्रुझ पोलीस स्टेशनला तर बाकीचे जुहू पोलीस स्टेशनमध्ये पाठवले गेले आहेत.  पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी भूखंडच मिळत नसल्याने हे पोलिस ठाणे अजूनही कागदावरच आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI