स्वराज्याचं कारागृह ते स्वराज्याचे पहारेकरी, अवघ्या 7 वर्षांच्या मावळ्याकडून अतिविशाल सुळके सर!

| Updated on: Jan 05, 2021 | 3:30 PM

मुंबईच्या घाटकोपरमध्ये (Ghatkoper Mumbai) राहणाऱ्या कार्तिक मोरेनं (Kartik More) महाराष्ट्रातील अतिशय अवघड मानले जाणाऱ्या सुळक्यांवर चढाई केली आहे

स्वराज्याचं कारागृह ते स्वराज्याचे पहारेकरी, अवघ्या 7 वर्षांच्या मावळ्याकडून अतिविशाल सुळके सर!
अवघ्या 7 वर्षांच्या कार्तिक मोरेनं वानरलिंगी सुळका सर करत,त्याच्यावर तिरंगा फडकवला!
Follow us on

मुंबई : शौर्य…पराक्रम…आणि थरार…मराठी माणसाच्या नसनसात भिनलाय. मग तो एखादा सरसळत्या रक्ताचा तरुण असो, वा वयाची अवघी 7 वर्ष पूर्ण केलेला चिमुरडा कार्तिक मोरे. (Kartik More) मुंबईच्या घाटकोपरमध्ये (Ghatkoper Mumbai) राहणाऱ्या अशाच एका चिमुरड्यानं महाराष्ट्रातील अतिशय अवघड मानले जाणाऱ्या सुळक्यांवर चढाई केली आहे. आधी स्वराज्याचं कारागृह असलेला लिंगाण्याचा सुळका (Lingana), नंतर महाकठीण मानला जाणारा वजीर सुळका (Vajeer Sulka) आणि आता जीवधन किल्ल्याचा पहारेकरी समजला जाणारा वानरलिंगी सुळका (Vanarlingi Sulka) सर केला. आणि अत्यंत कमी वयात हे सुळके सर करण्याचा भीम पराक्रम आपल्या नावावर नोंदवला. (Karthik More successfully Climb the Vanarlingi Sulka at the age of Seven)

मूर्ती लहान, किर्ती महान

कार्तिक मोरे हा मुंबईच्या घाटकोरमध्ये राहतो. त्याचं वय अवघं 7 वर्षांचं असून तो आता चौथीत शिकतो. कार्तिकचे वडील भरत मोरे हे सुद्धा ट्रेकर आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत कार्तिकनं महाराष्ट्रातील किल्ले पार करण्याचं ठरवलं. आणि एका पाठोपाठ एक असे महाराष्ट्रातील अवघड मानले जाणारे सुळके पार केले. जुन्नरच्या वानरलिंगी सुळक्यावर चढतात कार्तिकनं तिरंगा फडकवत मानवंदना दिली. त्याचे ट्रेकिंगचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

महाकठीण वानरलिंगी सुळकाही सर

वानरलिंगी सुळक्यावरुन जीवधन किल्ला आणि आसपासच्या परिसरावर नजर ठेवली जात होती. जीवधन किल्ल्याचा पहारेकरी अशी या सुळक्याची ओळख आहे. तब्बल 450 फूट उंचीचा आणि अतिशय उभ्या चढणीचा हा सुळका आहे. काळा मजबूत कातळ असल्यानं याच्यावर चढाई करणंही अवघड जातं. महाराष्ट्रातील ट्रेकर्ससाठी हा थराराचा उच्च अनुभव असतो. मात्र, हा सुळका कार्तिकनं अगदी सहजरित्या पार केला.

स्वराज्याच्या कारागृहावरही यशस्वी चढाई

लिंगणा हा किल्लाही कार्तिकने याआधी सर केला आहे. ज्याप्रमाणे रायगड ही स्वराज्याची राजधानी, तसंच लिंगाणा हे स्वराज्याचं कारागृह. कैद्यांना डांबून ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत होता. किल्ल्यावर कैद्यांना पोहचवल्यानंतर दोरखंड कापून टाकले जायचे. त्यामुळं किल्ल्यावरुन पळण्याचे सगळे मार्ग बंद होत. कुणी लिंगाण्यावरुन पळण्याचा प्रयत्न केलाच, तर शेकडो फूट खोल दरीत त्याचा अंत होत होता. हाच सुळकाही अवघ्या 7 वर्षाच्या कार्तिकनं सर करुन आपण महाराजांच्या मावळ्यांचेच वंशज असल्याचं सिद्ध केलं आहे.

 

(Karthik More successfully Climb the Vanarlingi Sulka at the age of Seven)