रेल्वे स्टेशनवर प्लास्टिक कपऐवजी कुल्लडमधूनच चहा : नितीन गडकरी

| Updated on: Sep 09, 2019 | 3:59 PM

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रेल्वे स्टेशनवरही (Railway Station) कुल्लडमधून (मातीचा पेला) चहा (Kullad Chai) उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली आहे.

रेल्वे स्टेशनवर प्लास्टिक कपऐवजी कुल्लडमधूनच चहा : नितीन गडकरी
Follow us on

मुंबई : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रेल्वे स्टेशनवरही (Railway Station) कुल्लडमधून (मातीचा पेला) चहा (Kullad Chai) उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे मातीकाम करणाऱ्या कुंभारांना रोजगार मिळेल, असंही गडकरींनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्या बहुतांशी ठिकाणी चहा देण्यासाठी प्लॅस्टिक किंवा कागदाच्या कपांचा उपयोग केला जातो. त्यामुळे होणारं प्रदुषण आणि इतर बाबी लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी कुल्लड चहाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे. यासाठी गडकरींनी रेल्वे मंत्री आणि सर्व राज्यांच्या वाहतूक सचिवांना प्लास्टिक आणि कागदी कपाऐवजी मातीचे भांडे (कुल्लड) देण्याची मागणी केली आहे. यातून कुंभार काम करणाऱ्यांना रोजगार मिळेल असंही गडकरींनी नमूद केलं.

मागील काही काळापासून कुल्लड चहाच्या मागणीतही वाढ होत आहे. त्यात तंदुरी चहाचीही क्रेझ आली आहे. लोकही कुल्लडमधून चहा पिण्यास प्राधान्य देत आहेत. मातीतील भांड्यातून चहा पिण्याचा अनुभव समाधान देणारा असतो, अशी प्रतिक्रिया चहाप्रेमी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे कुल्लडची मागणी हळूहळू वाढत आहे.

नव्या मोटार वाहन कायद्याविषयी बोलताना ते म्हणाले, तुम्ही नियम तोडाला नाही, तर फाईन भरण्याचं काम नाही. मुख्यमंत्री हा कायदा महाराष्ट्रात लागू करतील असं मला वाटतं.

‘विकास करताना काही झाडं तोडावी लागतात’

मुंबईत सध्या आरे येथील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. नागरिकांकडून मेट्रोच्या कामासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला तीव्र विरोध होत आहे. यावर बोलताना गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे वृक्षतोडीचे समर्थनच केले. ते म्हणाले, “सरकारने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं आहे. विकास आणि वृक्ष यांचा समतोल आपल्याला राखला पाहिजे. मात्र, अनेकदा विकास करताना काही झाडं तोडावी लागतात. पर्याय नसेल तर वृक्षतोड करावी लागते.”

नितीन गडकरी यांनी यावेळी प्रधानमंत्री व्यापारी पेन्शन योजना येणार असल्याचीही माहिती दिली.