‘महा करिअर पोर्टल’वरुन ऊर्दू भाषा गायब

पोर्टलवर मराठीसह इंग्रजी, हिंदी, तेलगू , गुजराथी , आसामी, बंगाली, उडिया, मल्याळम या भाषांमध्ये देण्यात आली आहे.

महा करिअर पोर्टलवरुन ऊर्दू भाषा गायब
| Updated on: Oct 07, 2020 | 12:07 PM

मुंबई: नववी आणि दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना करीअर मार्गदर्शन व माहितीसाठी राज्य शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या महा करिअर पोर्टलवर उर्दू भाषेत माहिती उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक विभागाकडून 22 सप्टेंबर रोजी महा करीयर पोर्टल सुरू करण्यात आले होते. या पोर्टलवर शैक्षणिक टक्केवारी कमी असलेल्या नऊ भाषांमध्ये मजकूर उपलब्ध आहे. यामध्ये उर्दूचा समावेश नसल्याने मुस्लीम समाजातून नापसंती व्यक्त केली जात आहे. (Information on Maha career portal )

महाराष्ट्रात मराठी नंतर सर्वाधिक शिक्षण उर्दू भाषेत घेतले जात असताना त्याच मुख्य भाषेत ही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्रात मराठी 72 %,ऊर्दू 7.30% ,हिंदी 6.87%,गुजराथी 2.72%,तेलगू 1.57%,कन्नड 1.59% अशी शिक्षण घेणाऱ्या भाषिक विद्यार्थ्यांची संख्या असून असे असताना ऊर्दू भाषेतील विद्यार्थ्यांना अशा शैक्षणिक अभ्यासक्रम , शिष्यवृत्ती यांची माहिती मिळूच नये का, अशी खंत व्यक्त केली जात आहे.

महा करिअर पोर्टलवर उर्दू भाषेत माहिती नसणे, हे अन्यायकारक आहे. महाविकासआघाडीमध्ये सहभागी असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाला अल्पसंख्याक समाजाची मते मिळतात. मात्र, तरीही हे पक्ष या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केला. महाविकासआघाडी अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी काम करीत असल्याचे दावा करते. मग या शैक्षणिक मार्गदर्शन करणाऱ्या महा करिअर पोर्टल वरून ऊर्दू भाषाच हद्दपार झाली आहे. मग सर्व पक्ष झोपले आहे का, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी 22 सप्टेंबर रोजी महा करिअर या पोर्टल चे लोकार्पण केले होते. या पोर्टलवर विविध 556 शैक्षणिक अभ्यासक्रम , 1100 पेक्षा जास्त पात्रता परीक्षा , 1200 हुन अधिक शासकीय निमशासकीय शिष्यवृत्ती याबाबत माहिती उपलब्ध आहे. ही माहिती मराठीसह इंग्रजी, हिंदी, तेलगू , गुजराथी , आसामी, बंगाली, उडिया, मल्याळम या भाषांमध्ये देण्यात आली आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षाने आपण महा करिअर पोर्टलवर उर्दू भाषेच्या समावेशासाठी पूर्वीपासूनच पाठपुरावा करत असल्याचा दावा केला. यासंदर्भातआपण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची दोन वेळा भेट घेतली. यावर कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आले. मात्र, अजूनही महा करिअर पोर्टलवर उर्दू भाषेचा समावेश न होणे अन्यायकार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आम्ही आंदोलन करू शकत नाही. परंतु समाजातील लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सांगितले.

(Information on Maha career portal )