बस, विमानातून प्रवासाला परवानगी, मग सर्वसामांन्यानी काय घोडं मारलं; भाजपचा ‘रेलभरो’, दरेकरांना 260 रुपयांचा दंड

| Updated on: Aug 06, 2021 | 11:45 AM

सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी म्हणून भाजपने आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन केलं. चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात शेकडो भाजप कार्यकर्ते जमले. (Maharashtra BJP Protest Demanding Resumption of Suburban Services For Vaccinated Passengers)

बस, विमानातून प्रवासाला परवानगी, मग सर्वसामांन्यानी काय घोडं मारलं; भाजपचा रेलभरो, दरेकरांना 260 रुपयांचा दंड
bjp protest
Follow us on

मुंबई: सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी म्हणून भाजपने आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन केलं. चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात शेकडो भाजप कार्यकर्ते जमले. यावेळी आंदोलकांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं. बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, सर्वसामान्यांनी काय घोडं मारलं? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. विनातिकीट प्रवास केल्याप्रकरणी दरेकर यांना रेल्वेकडून 260 रुपयांचा दंड आकारण्यात आला. (Maharashtra BJP Protest Demanding Resumption of Suburban Services For Vaccinated Passengers)

भाजपचे नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात ही आंदोलने करण्यात आली. यावेळी आमदार मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. तर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आमदार राहुल नार्वेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर, कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्ते जमले होते. यावेळी आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सर्व सामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दोन डोस घेतलेल्यांना मुभा द्या

कोर्टानेही रेल्वे प्रवासाबाबत विचारणा केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारने प्रस्ताव दिला तर लगेच रेल्वे सुरू करू असं म्हटलं आहे. तरीही सरकार लोकल का सुरू करत नाही? असा सवाल दरेकर यांनी केला. बस प्रवासाची परवानगी देता, विमान प्रवासाची परवानगी देता तर मग रेल्वे प्रवासाची मुभा का दिली जात नाही. सर्वसामान्यांनी काय घोडं मारलं आहे. त्यांनी कोणतं पाप केलं आहे? असा सवाल करतानाच ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना प्रवास मुभा दिलीच पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.

260 रुपये दंड

यावेळी टीसीने दरेकर यांना विनातिकीट प्रवास केल्याबद्दल 260 रुपयांचा दंड आकारला. दरेकर यांनीही दंड भरला. आम्ही कायदेभंग केला. विनातिकीट प्रवास केला. त्यामुळे 260 रुपयांचा दंड भरला आहे. पोलीस, रेल्वे प्रशासन त्यांचं काम करत आहेत. त्याला आमचा विरोध नाही. पण सरकारच्या धोरणावर आमचा आक्षेप आहे. आम्हाला कितीही दंड करा, अटक करा, आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी लढतच राहणार आहे, असा इशारा दरेकर यांनी दिला.

भातखळकरांचा रास्ता रोको

अतुल भातखळकर शेकडो कार्यकर्त्यांसह कांदिवली रेल्वे स्थानकाबाहेर जमले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक जमाव आक्रमक झाला. यावेळी पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे भातखळकर यांनी रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळलं. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी भातखळकरांसह काही जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर या परिसरातील तणाव निवळला.

टीव्ही9च्या प्रतिनिधीला धक्काबुक्की

यावेळी आंदोलनाचं वृत्त संकलन करण्यात आलेले टीव्ही 9 मराठीचे पत्रकार अक्षय कुडकेलवार यांना रेल्वे पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे मीडिया प्रतिनिधींनी स्थानकातच बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे रेल्वे पोलिसांची एकच धावपळ उडाली. दरेकर यांनीही मध्यस्थी करत मीडियाशी गैरवर्तन करू नका, असं रेल्वे पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी ठिय्या आंदोलन न करण्याची विनंती केल्याने अखेर मीडियानेही आपलं आंदोलन मागे घेतलं. (Maharashtra BJP Protest Demanding Resumption of Suburban Services For Vaccinated Passengers)

 

संबंधित बातम्या:

राज्यात फक्त ‘काय’द्यायचे राज्य आहे का?; आशिष शेलार यांचा सवाल

‘दोन शिवसैनिकांची भेट’, राऊतांच्या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हेंचं खास ट्विट

केंद्र सरकार चारही स्तंभ मोडित काढायला निघालंय; राऊतांचा घणाघाती हल्ला

(Maharashtra BJP Protest Demanding Resumption of Suburban Services For Vaccinated Passengers)