Maharashtra Marathi Breaking News Live : मनसेच्या दोन गटात नवी मुंबईत राडा, अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप

Maharashtra Breaking News Live Updates : आज 9 जानेवारी 2024 देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Marathi Breaking News Live : मनसेच्या दोन गटात नवी मुंबईत राडा, अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप
| Updated on: Jan 10, 2024 | 7:17 AM

मुंबई, दि. 9 जानेवारी 2024 | आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल बुधवारी येणार आहे. यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने जामीन नाकारला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत नवरत्न महिला सन्मान व लाभार्थ्यांना लाभ वाटप गडचिरोलीत करणार आहे. रत्नागिरीतील गुहागमध्ये मंगळवारी अचानक पाऊस सुरू झाला. त्याचा फटका गुहागरमधील अंबा बागायतदारांना बसणार आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.  त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Jan 2024 08:56 PM (IST)

    नरेंद्र मोदी नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनाला जाण्याची शक्यता

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनाला येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला काळाराम मंदिरात दर्शन घेऊन आरती करण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याआधी मोदी श्री काळारामाच्या चरणी नतमस्तक होणार असल्याची आहे. केंद्रीय पथक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून काळाराम मंदिरात पाहणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २२ जानेवारीला उद्धव ठाकरे देखील श्री काळारामाचं दर्शन आणि आरती करण्यासाठी येणार आहेत मंदिरात

  • 09 Jan 2024 06:50 PM (IST)

    मनसेच्या दोन गटात नवी मुंबईत राडा, अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप

    मनसेच्या दोन गटात नवी मुंबईत जोरदार राडा झाला आहे. अमित ठाकरे यांच्यावर मारहाणीचा आरोप केल्यानंतर वातावरण तापलं आहे. महेश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता.

  • 09 Jan 2024 06:37 PM (IST)

    पंजाबमध्ये एसटीएफच्या चकमकीत दोन ड्रग तस्कर ठार

    पंजाबमधील झिरामध्ये एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत दोन ड्रग तस्कर ठार झाले आहेत. घटनास्थळावरून ड्रग्ज आणि तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ड्रग्स तस्करांनी पोलीस दलावर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली.

  • 09 Jan 2024 06:25 PM (IST)

    22 जानेवारी रोजी यूपीमध्ये दारूची दुकाने, शाळा आणि महाविद्यालयं राहणार बंद

    राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये 22 जानेवारीला दारूविक्री बंद राहणार आहे. सर्व शासकीय इमारती सुशोभित केल्या जाणार असून सर्व जिल्ह्यांमध्ये फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे. 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद राहतील.

  • 09 Jan 2024 06:16 PM (IST)

    अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदी आणि यूएई अध्यक्षांचा रोड शो

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान गुजरातमधील अहमदाबादमध्ये रोड शो करत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने लोक उपस्थित असून दोन्ही नेत्यांचे स्वागत करत आहेत.

  • 09 Jan 2024 05:55 PM (IST)

    शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार

    मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आव्हाड यांच्याविरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आव्हाड यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • 09 Jan 2024 05:44 PM (IST)

    “आपल्या राज्यात येणारे प्रकल्प धमकावून नेले जात आहे”, आदित्य ठाकरे

    कोल्हापूर | ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच ठाकरे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे नक्की काय बोलले जाणून घेऊयात.

    राज्यात गेली दोन अडीच वर्ष भयंकर परिस्थिती आहे. ही राज्याच्या अस्तित्वाची लढाई आहे. 50 खोके घेणारे ओके झाले, पण राज्य नॉट ओके झालंय.गेल्या दोन वर्षात राज्यात काही चांगलं झालंय का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातून गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पावरुन मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला.

    “जे रोजगार आपण राज्यात आणत होतो ते बाहेर गेले आहेत. फोकस्कॉन महाराष्ट्र मध्ये येणार होता तो गुजरात कसा गेला. मणिपूर ला दंगली पेटल्या तिथं केंद्राला जावस वाटलं नाही, पण आमचे प्रकल्प तिकडे न्यावेसे वाटले. आपल्या राज्यात येणारे प्रकल्प धमकावून नेले जात आहे उद्योग मंत्री फाईव्ह स्टार मध्ये फिरतात, पण midc मध्ये सुविधा त्यांना द्यायच्या नाहीत”, असं ठाकरे म्हणाले.

  • 09 Jan 2024 05:15 PM (IST)

    चित्रपटात राम यांनी जंगलात मांसाहार केल्याचा हिंदुत्ववादी संघटनेचा दावा

    मुंबई | नेटफ्लिक्सवर अन्नपूर्णी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात राम जंगलात मांसाहार करत असल्याची दृश्य दाखवण्यात आली आहेत, तसेच अनेक गोष्टी सनातन विरोधी दाखवल्याचा दावा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने करत निषेध केला आहे. या निषेधार्थ विहिंप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी येथील झी स्टुडिओमध्ये जाऊन निदर्शने केली.

  • 09 Jan 2024 05:05 PM (IST)

    वेगवान तपासासाठी पुणे पोलिसांचा गुन्हे शाखा पथक करणार

    पुणे | पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद मोहळ हत्या प्रकरणीचा तपास आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. गँगस्टर शरद मोहोळच्या खूनाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्तांकडून आता तपास होणार आहे.

  • 09 Jan 2024 04:59 PM (IST)

    तर गुन्हे दाखल करणार

    तलाठी भरतीवरून सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे. तलाठी भरती वरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार निशाणा साधत या भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. तर, ही भरती पारदर्शक पद्धतीने झाली आहे, जर कोणी अशा पद्धतीने सरकारची बदनामी करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

  • 09 Jan 2024 04:50 PM (IST)

    मनसे हा पक्ष खंडणीखोर- महेश जाधव

    राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष खंडणीखोर असल्याचा आरोप पक्षाचेच महेश जाधव यांनी केला. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि महेश जाधव यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली.

  • 09 Jan 2024 04:40 PM (IST)

    श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला सुरुवात

    दिवे बसवण्याच्या विधीने सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेतील मानकरी सुहास दर्गोपाटील यांच्या घरी मंगलमय वातावरणात देव्हाऱ्यामध्ये दिवे बसविण्याचा कार्यक्रम पार पडला. यात्रेनिमित्त दरवर्षी मानकऱ्यांच्या घरी दिवे बसवले जातात, ही परंपरा 900 वर्षांपासून चालत आली आहे.सोमवारी यात्रेतील मुख्य मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या उपस्थितीत मानकरी सुहास दर्गो पाटील यांच्या घरी भक्तिभावाने दिवे बसविण्यात आले. यावेळी पूजाविधी आणि नैवेद्य अर्पण करून मुख्य मानकऱ्यांची पाद्यपूजा करण्यात आली. मागील 900 वर्षापासून ही परंपरा सुरू असून याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया सुहास दर्गोपाटील यांनी दिली.

  • 09 Jan 2024 04:30 PM (IST)

    निकाल त्यांच्या बाजूने लागूच शकत नाही

    शिवसेनेतील आमदार अपात्रताप्रकरणात निकाल उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या बाजूने लागूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली. ऑन मेरिट निकाल आमच्या बाजूनेच असेल.. कारण निवडणूक आयोगाने पक्ष आम्हाला दिला ,चिन्ह आम्हाला दिलेले आहे.. आणि जी काही मेजॉरिटी आमच्याकडे आहे.. त्याच्यामुळे मेरीट आधारावर आणि घटनात्मक अधिकाराच्या आधारे हा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास आमदार गायकवाड यांनी शिवसेना आमदार अपात्रतेवर व्यक्त केला आहे.

  • 09 Jan 2024 04:20 PM (IST)

    विश्वकर्मा योजनेवर स्तुतीसुमने

    विश्वकर्मा योजनेवर खासदार उदयनराजे भोसले यांनी स्तुतीसुमने उधळली. गरीबी हटाव देश बचाओ ही घोषणा सर्वांनी दिली. घोषणा देऊन फारसं काही होत नाही. मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली विश्वकर्मा जी योजना आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी राबवली जात आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा उपस्थित राहिले याबद्दल मी स्वागत करतो. या पक्षात टीमवर्क असल्यामुळे याची ओळख देशातच नव्हे तर जगभरात झाली आहे, असे ते म्हणाले. विश्वकर्मा योजना ही दुर्लक्षित कारागीर आहेत त्यांच्या योगदानासाठी आहे. जे कारागीर आहेत त्यांना योग्य प्रवाहात आणून मार्केट उपलब्ध करून देण्याचे काम ही योजना करत आहे, असे ते म्हणाले.

  • 09 Jan 2024 04:11 PM (IST)

    अकोल्यात ठाकरे गटाचा मोर्चा

    अकोला : अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याविरोधात ठाकरे गटाचे बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ट्युशन एरिया असलेल्या न्यु तोष्णीवाल लेआऊट ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा हा मोर्चा निघाला.

  • 09 Jan 2024 04:10 PM (IST)

    बिबट्याचा मुक्त संचार

    अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर शहरात बिबट्याचा मुक्त संचार आहे. त्यामुळे नागरीक भयभीत झाले आहेत. पारनेर शहरालगत जामगाव रोडवर,औटी वस्ती,चौधरी विटभट्टी जवळ बिबट्यांचा मुक्त संचार सुरु आहे. अनेकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची भांबेरी उडली आहे. वन विभागाने पिंजरा लावण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. भक्षाच्या शोधत बिबट्या शहरात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • 09 Jan 2024 04:00 PM (IST)

    आरती मोर्चाने वेधले लक्ष

    इगतपुरी तालुक्यातील वंचित आदिवासींना हक्काचे घरकुल मिळावे या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली टिटोली ते पंचायत समिती कार्यालयावर आरती मोर्चा काढण्यात आला. आदिवासींना घरकुल मिळावे यासाठी अनेक गट विकास अधिकारी यांना अनेक वेळा प्रस्ताव दिलेले आहे. मात्र या प्रस्तावावर काहीच कार्यवाही होत नसल्यामुळे गटविकास अधिकारी यांना प्रसन्न करण्यासाठी हा आरती मोर्चा काढण्यात आला.

  • 09 Jan 2024 03:55 PM (IST)

    आव्हाड कोणाच्या नोकरीवर ते माहित आहे, अमोल मिटकरी यांची टीका

    मुंबई : राष्ट्रवादीच्या (अजितदादा गट) सर्व प्रवक्त्यांची बैठक अध्यक्षांनी घेतली. या बैठकीमध्ये पक्षअंतर्गत चर्चा झाली. यापुढे अधिक ताकदीने आम्ही लढणार आहोत अशी माहिती प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत. ते कोणाच्या पगारीच्या नोकरीवर आहेत हे सगळ्याना माहित आहे अशी टीकाही त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली.

  • 09 Jan 2024 03:44 PM (IST)

    पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमधून लोकसभा लढावी, कुणी केली मागणी?

    नाशिक : नाशिकमधून मोदी यांना सर्व जनता पाठिंबा देईल असा विश्वास साधू महंतांनी व्यक्त केला आहे. 12 तारखेच्या सभेदरम्यान मोदी यांची भेट घेऊन काशीप्रमाणे मोदी यांच्या हातून नाशिक तीर्थक्षेत्राचा कायापालट व्हावा यासाठी मागणी करणार आहे. तसेच, त्यांनी आगामी लोकसभा नाशिकमधून लढवावी असे साकडं घालण्यात येणार आहे असे नाशिकच्या साधू महंतांनी सांगितले.

  • 09 Jan 2024 03:40 PM (IST)

    पुरुषांना पैसे दिले की ते बुडवतात, महिलांना एक लाख रुपये देणार – देवेंद्र फडणवीस

    गडचिरोली : जेव्हा एखाद्या महिलेला सशक्त करतो तेव्हा संपूर्ण परिवार सशक्त होतो. महिला व्यसनावर पैसे खर्च करत नाही. त्यामुळे महिला सशक्तीकरण म्हणजे कुटुंब सशक्तीकरण. लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं म्हणून ते घर लखपती व्हावी यासाठी महिलांना एक लाख रुपये देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महिलांना पैसे दिले त्या कधीच बुडवत नाही. त्यामुळे सगळ्या योजना महिलांसाठी तयार करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

  • 09 Jan 2024 03:30 PM (IST)

    ट्रक चालक – मालकाशी सल्लामसलत करून निर्णय घेणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचे लेखी आश्वासन

    नवी दिल्ली : हिट अँड रन कायद्यातील तरतुदीविषयींचा निर्णय हा ट्रक चालक आणि मालक यांच्याशी सल्लामसलत करून घेतला जाईल असे लेखी आश्वासन केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहे. नव्या फौजदारी कायद्यात हिट अँड रन बाबत कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याविरोधात ट्रक चालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

  • 09 Jan 2024 03:26 PM (IST)

    त्यांचं प्रकरण गंडलंय… विजय आमचाच, शिंदे गटाच्या आमदारांचे मोठे विधान

    मुंबई : एकनाथ शिंदे हे आमचे गटनेते आहेत आणि होते. त्यामुळे त्यांनी माझी नियुक्ती केली ती त्यांच्या अधिकारांमध्ये केली. त्या हिशोबाने मी गट नेता आहे आणि आमचाच व्हिप लागू होतो. सुनिल प्रभू यांना विचारा की त्यांनी सुनावणीच्या दरम्यान कागदपत्रांची पूर्तता योग्यरीत्या केली आहे का? त्यांचं प्रकरण गंडलंय… आमची बाजू आम्ही भक्कम मांडली आहे. त्यामुळे विजय आमचाच होईल असे विधान शिंदे गटाचे प्रतोद भरत शेठ गोगावले यांनी केलंय.

  • 09 Jan 2024 03:19 PM (IST)

    भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी जे काय करावं लागेल ते करू – नाना पटोले

    नवी दिल्ली : सीट शेअरींगवर चर्चा होईल. भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते करणार. त्यावरच सीट शेअरिंग होईल. महाविकास आघाडीत कुठलीही अडचण येणार नाही. फार काही जागा वाटपावर घोळ होईल असं वाटत नाही. काही जागा वाटपाचा मुद्दा आला तर त्याचा निर्णय हायलेवलवर होईल, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

  • 09 Jan 2024 03:03 PM (IST)

    मलंगगडाला देखील आपले मुख्यमंत्री मुक्ती देतील, खासदार श्रीकांत शिंदे

    कल्याण : अफजल खानाचा कोथळा दोन वेळा काढण्यात आला. पहिला कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता. तर, प्रताप गडावरील अतिक्रमण या सरकारने काढत दुसऱ्यांदा अफजल खानाचा कोथळा काढला. देशात राम मंदिर उभे राहत आहे. त्याचप्रमाणे मलंग गडाला मुक्ती देखील आपले मुख्यमंत्री देतील असे आश्वासन देतो असे विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण उसाटणे येथील मलंगगड हरीनाम उत्सवाच्या सांगता करताना केले.

  • 09 Jan 2024 02:53 PM (IST)

    प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा खा.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ

    सातारा: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा खा.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांची उपस्थिती. पारंपारिक कारागिरांच्या मदतीसाठी आहे ही केंद्रीय योजना. सातारा लोकसभा मतदारसंघातील 25 विश्वकर्मा योजनेच्या चित्ररथाचे एकाच वेळी खा.उदयनराजेंच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे शुभारंभ.

  • 09 Jan 2024 02:46 PM (IST)

    शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात अर्ज

    नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात अर्ज. मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी भेट घेतल्याच्या विरोधात ठाकरे गटाचा अर्ज दाखल. सात तारखेला भेट घेतल्याचा अर्जात उल्लेख. अर्ज दाखल करून मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकर यांच्या भेटीवर घेतला आक्षेप.

  • 09 Jan 2024 02:35 PM (IST)

    कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती पुन्हा करणार मराठवाड्याचा दौरा

    कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती पुन्हा करणार मराठवाड्याचा दौरा. 11 आणि 12 तारखेला संभाजीनगर आणि लातूरला बैठका होणार आहेत. आणखी कुणबी नोंदी शोधण्यासाठी समिती करणार प्रयत्न.

  • 09 Jan 2024 02:28 PM (IST)

    मोदींनी नाशिकमधून लोकसभा लढावी, नाशिकच्या साधू महंतांचे मोदींना साकडं

    नाशिक : मोदींनी नाशिकमधून लोकसभा लढावी असे नाशिकच्या साधू महंतांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं. 12 तारखेच्या सभेदरम्यान मोदींची भेट घेऊन ही मागणी करणार आहेत. काशी प्रमाणे मोदींच्या हातून नाशिक तीर्थ क्षेत्राचा देखील कायापालट व्हावा यासाठी मागणी. नाशिकमधून मोदींना सर्व जनता पाठिंबा देईल असा साधू महंतांनी विश्वास व्यक्त केला.

  • 09 Jan 2024 01:51 PM (IST)

    Maharashtra News : साताऱ्यात अवकाळी पावसाची रिपरिप

    अवकाळी पावसाचा फटका सातात्यालासुद्धा बसला आहे. जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची रिपरिप सुरू आहे. स्टोबेरीच्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.

     

  • 09 Jan 2024 01:43 PM (IST)

    Maharashtra News : केंद्र सरकार बदलत नाही तोपर्यंत धाडसत्र सुरूच राहाणार- शरद पवार

    ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि रविंद्र वायकर यांच्या घरावर आणि कार्यालयावर झालेल्या छापेमारीवर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.  केंद्रातले सरकार बदलत नाही तोपर्यंत धाडसत्र सुरूच राहाणार असं शरद पवार म्हणाले.

  • 09 Jan 2024 01:35 PM (IST)

    Maharashtra News : बीडमध्ये मुदत संपलेल्या रिक्षांवर RTO ची कारवाई सुरू

    मुदत संपलेल्या रिक्षांवर बीडमध्ये कारवाई सुरू आहे. या कारवाईत 70 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. RTO च्या या कारवाईमुळे रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.

  • 09 Jan 2024 01:31 PM (IST)

    Maharashtra News : एसटी कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार लांबणीवर

    जानेवारी महिन्याची 9 तारिख उजाडली तरी एसटी करमचाऱ्याना अद्याप डिसेंबर महिन्याचा पगार मिळालेला नाही. सरकारणं सवलतीची रक्कम दिली नसल्यानं पगार लांबणीवर

  • 09 Jan 2024 01:24 PM (IST)

    Nagpur News : नागपूरच्या अंबाझरी तलाव सुरक्षेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापण

    नागपूरच्या अंबाझरी तलाव सुरक्षेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापण करण्यात आली आहे. गेल्या पावसाळ्यात नागपूरच्या अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने अनेक भागात पूर आला होता.

  • 09 Jan 2024 01:21 PM (IST)

    Dhangar Reservation : धनगर आरक्षणाच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी

    धनगर आरक्षणाच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी याचिका दाखल केली गेली होती. यासाठीचे पुरावे न्यायालयात सादर केले गेले आहे.

  • 09 Jan 2024 01:16 PM (IST)

    Maharashtra News : ठाकरे गटाचे दोन नेते केंद्रीय यंत्रणांच्या रडारावर

    ठाकरे गटाचे दोन शिलेदार केंद्रीय यंत्रणांच्या रडारावर आहेत. रविंद्र वायकर आणि राजन विचारे असं या नेत्यांच नाव आहे. रविंद्र वायकर यांच्या घरी इडीची छापेमारी सुरू आहे तर राजन विचारे यांच्या घरी आयकर विभागाचा छापा पडला आहे.

  • 09 Jan 2024 12:55 PM (IST)

    आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा – उद्धव ठाकरे

    अध्यक्ष गोगावलेंची नियुक्ती वैध ठरणार का ते पाहू. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा  आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

  • 09 Jan 2024 12:50 PM (IST)

    न्यायमूर्तीच आरोपीला २ वेळा भेटले – उद्धव ठाकरे

    विधानसभा अध्यक्ष २ वेळा मुख्यमंत्री शिंदेंना भेटले. हे म्हणजे न्यायमूर्तीनींच आरोपीची भेट घेतली – उद्धव ठाकरे

  • 09 Jan 2024 12:46 PM (IST)

    दीड वर्षांपासून आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू – उद्धव ठाकरे

    दीड वर्षांपासून आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू आहे. वेळकाढूपणा सुरू आहे हे आम्हाला सुनावणीतच कळलं होतं, उद्धव ठाकरेंची टीका.

  • 09 Jan 2024 12:41 PM (IST)

    दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत धाडसत्र सुरूच राहणार – शरद पवार

    दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत धाडसत्र सुरूच राहणार, रवींद्र वायकर यांच्या घरी सुरू असलेल्या छापेमारीवर शरद पावर यांनी दिली प्रतिक्रिया

  • 09 Jan 2024 12:35 PM (IST)

    आम्ही चर्चेतून मार्ग काढू – शरद पवार

    सध्या लोकसभेत काँग्रेसच्या जागा जास्त आहेत. काँग्रेसकडे लोकसभेत जास्त जागा जिंकण्याची क्षमता, असं शरद पवार म्हणाले.

    जागावाटपात प्रत्येक पक्षांची मागणी जास्त जागांचीच असते, आम्ही चर्चेतून मार्ग काढू, असंही त्यांनी नमूद केलं.

  • 09 Jan 2024 12:26 PM (IST)

    मविआच्या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा होईल – शरद पवार

    आगामी निवडणुकीत एकत्र काम कसं करावं यावर आज चर्चा होईल , असे शरद पवार यांनी दिल्लीतील मविआच्या बैठकीबाबत सांगितलं. आमच्या पक्षाकडून जितेंद्र आव्हाड बैठकीत सहभागी होतील, असेही त्यांनी नमूद केलं.

  • 09 Jan 2024 12:18 PM (IST)

    बिल्कीस बानो प्रकरणातील निकालाने सामान्यांना दिलासा – शरद पवार

    बिल्कीस बानो प्रकरणातील निकालाने सामान्यांना दिलासा मिळाला, असं शरद पवार म्हणाले. बिल्कीस बानो प्रकरण महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने घ्यावं , गृहमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असं त्यांनी सांगितलं.

  • 09 Jan 2024 12:16 PM (IST)

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर. योगी आदित्यनाथ यांनी हनुमान गढीचं दर्शन घेतल .  हनुमान गढीचं दर्शन घेऊन योगी आदित्यननाथ विकासकामांचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले असून आज अयोध्येत प्रशासनाची बैठक घेणार आहेत.

  • 09 Jan 2024 11:59 AM (IST)

    Live News : रविंद्र वायकर यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीर भाग – संदीपान भुमरे

    रविंद्र वायकर यांच्यावर झालेली कारवाई दबाव टाकण्यासाठी नाही, कायदेशीर भाग आहे… असं वक्तव्य संदीपान भुमरे यांनी केलं आहे. ‘उद्याच्या सुनावणीची आम्हाला काहीही चिंता नाही, निकाल आमच्या बाजूने लागणार कारण बहुमत आमच्या बाजूने आहे. शिंदे साहेबांनी सांगितल्यास मी लोकसभा निवडणूक लढवायला तयार आहे…’ असं देखील संदीपान भुमरे म्हणाले…

  • 09 Jan 2024 11:56 AM (IST)

    Live News : कोविडमध्ये जो भ्रष्टाचार झालेला, कोणी किती पैसे खाल्ले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकर याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘कोविडमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्यात कोणी किती पैसे खाल्ले… डेड बॉडी बॅग, खिचडी 300 ग्रामची 150 ग्राम ऑक्सीजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले.. कोणाला घाबरची काय आवश्यकता ज्याला कर नाही त्याला डर कशाला..’

     

  • 09 Jan 2024 11:35 AM (IST)

    Live News : रुग्णालयात देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये आढळल्या आळ्या

    नंदुरबार येथील अक्कलकुवा तालुक्यातील खापर रुग्णालयात देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये आढळल्या आळ्या… ठाकरे गटाच्या आमदार आमश्या पाडवी यांनी दिलेल्या भेटीत आला प्रकार समोर….संबंधित पुरवठा दारावर कारवाई करण्याची आमदार पाडवी यांची मागणी… संबंधित कंपनीने केलेला पुरवठा सील करण्याची मागणी…

     

  • 09 Jan 2024 11:21 AM (IST)

    Live News : बुलढाण्यात टॉवर वर चढले चार जण

    बुलढाण्यात टॉवर वर चढले चार जण… महादेव कोळी समाजाला आरक्षण देण्याची मागणीसाठी आंदोलन… मोबाईल टॉवर वर चढून शोले आंदोलन… पोलिसांकडून आंदोलक कर्त्यांना खाली उतरवण्याच्या प्रयत्न ..

     

  • 09 Jan 2024 10:57 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा वाशी या भागात अवकाळी पावसाला सुरुवात

    धाराशिव- धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा वाशी या भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. रिमझिम पाऊस सुरु झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात आला आहे. ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होत आहे. अगोदरच दुष्काळ त्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

  • 09 Jan 2024 10:45 AM (IST)

    रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड

    उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड टाकण्यात आली आहे. सकाळी 8.30 वाजल्यापासून ईडीचं पथक वायकर यांच्या घरी दाखल झालं आहे. ईडीचे 10 ते 12 अधिकारी वायकर यांच्या घरी चौकशीसाठी आले आहेत. जोगेश्वीर इथल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर ईडीच्या रडारवर आहेत.

     

  • 09 Jan 2024 10:30 AM (IST)

    अयोध्या शहरात केंद्रीय पोलीस यंत्रणा तैनात

    अयोध्या शहरात केंद्रीय पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसरात उत्तर प्रदेश पोलीस आणि केंद्रीय पोलीस यंत्रणा गस्त घालणार आहे. राम मंदिर उडवून देण्याची पण धमकी देण्यात आली होती. मात्र आतापासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवळपास ३५ हजार पोलीस कर्मचारी अयोध्येत तैनात असतील.

  • 09 Jan 2024 10:15 AM (IST)

    नवी दिल्ली- महाराष्ट्रातल्या जागा वाटपसंदर्भात संध्याकाळी चार वाजता बैठक

    नवी दिल्ली- महाराष्ट्रातल्या जागा वाटपसंदर्भात संध्याकाळी चार वाजता बैठक होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह नाना पटोले, जयंत पाटील बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत.

  • 09 Jan 2024 09:57 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यावर ‘अवकाळी’चं सावट

    सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.  गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारवा अनुभवायला मिळतोय.  अवकाळी पावसामुळे ज्वारी, द्राक्षे, कांदा, अशा अनेक पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

  • 09 Jan 2024 09:45 AM (IST)

    दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये

    दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे आढळून आलं आहे. अचानक ही संख्या का वाढली, याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येतोय.  दहावीची विद्यार्थी संख्या १६ लाख १० हजार जास्त, तर बारावीची संख्या १५ लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या का वाढली? त्या मागे अन्य काही विशेष कारणे आहेत का?, याचा अभ्यास सध्या केला जातोय.

  • 09 Jan 2024 09:29 AM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळे आज नाशकात

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. बावनकुळे काळाराम मंदिरात श्रीरामाची आरती करणार आहेत. सकाळी 11 वाजता ते आरती करणार आहेत. गिरीश महाजन देखील उपस्थित राहणार आहेत.  तर येत्या 22 तारखेला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात महाआरती करणार आहेत.

  • 09 Jan 2024 09:15 AM (IST)

    आदित्य ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर

    आदित्य ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.  आदित्य ठाकरे यांची तीन वाजता गारगोटी शहरात तर सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी इथं जाहीर सभा घेणार आहेत. जाहीर सभेत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कोल्हापुरातील मिरजकर तिकीट सभेच्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.

  • 09 Jan 2024 08:55 AM (IST)

    Maharashtra News | नांदिवली तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

    कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू. प्रियकरानं तलावात उडी मारल्याचा समजातून प्रेयसीची तलावात उडी. तरुणीला तलावातून बाहेर काढले त्याच वेळी तिचा प्रियकर समोर आल्याने तिचा गैरसमज झाला दूर. विचित्र घटनेमुळे कल्याण नांदिवली परिसरात खळबळ

  • 09 Jan 2024 08:48 AM (IST)

    Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी

    राज्य मागासवर्ग आयोगाची मुंबईत बैठक. 11 जानेवारीला दुपारी 3 वाजता बैठकीच आयोजन. मराठा समाजच सर्वेक्षण सुरू करण्यावर होणार अंतिम शिक्कामोर्तब. 11 तारखेला बोलवली तातडीची बैठक.

  • 09 Jan 2024 08:25 AM (IST)

    National News | उत्तर भारतात थंडीची लाट कायम

    राजधानी दिल्लीत आजचे तापमान आठ अंश सेल्सिअस. कडाक्याच्या थंडीतही प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी. उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आज दिवसभरात पावसाची शक्यता. दहा तारखेपर्यंत दिल्लीसह हरियाणा हिमाचल प्रदेशातील शाळांना सुट्टी जाहीर.

  • 09 Jan 2024 08:11 AM (IST)

    Maharashtra news | रत्नागिरीत अवकाळी पाऊस

    रत्नागिरी परिसरात मध्यरात्री अवकाळी पाऊस. विजांच्या कडकडाटासह अर्धातास पावसाच्या दमदार सरी. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत. लांजा शहरात अजूनही वीज पुरवठा सुरळीत नाही. आज देखील दिवसभरात अवकाळी पावसाचा अंदाज. सकाळपासून ढगाळ हवामान, हवामान खात्याचा इशारा. अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली.

  • 09 Jan 2024 07:59 AM (IST)

    Marathi News | आता बेघरांना मिळणार हक्काचे घर

    पुणे जिल्ह्यातील बेघरांसाठी १८६७ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. घरकुलासाठी पात्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील १ हजार ८६७ बेघरांना आता जिल्हा परिषदेने घरकुल मंजूर केले आहे. यामुळे आता बेघरांना मिळणार हक्काचे घर मिळणार आहे.

  • 09 Jan 2024 07:50 AM (IST)

    Marathi News | 35 वर्षानंतर रस्त्याचे काम

    सांगलीतील बहुचर्चित पेठ रस्त्याच्या प्रत्यक्ष कामांचे उद्घाटन आज भाजपाकडून करण्यात आले. पेठ सांगली या सुमारे 41 किलोमिटर अंतराचा हा रस्ता 860 कोटी 45 लाख रुपये खर्चून केला जाणार आहे. संपूर्ण रस्ता हा कॉक्रीटकरण केला जाणार आहे. तब्बल 35 वर्षानंतर या मुख्य रस्त्याचे काम होत असल्याने वाळवा तालुक्यासह सांगली वासियांकडून स्वागत होत आहे.

  • 09 Jan 2024 07:37 AM (IST)

    Marathi News | पुण्यात शनिवारी मनसेचा मेळावा

    पुण्यात शनिवारी मनसेचा मेळावा आहे. या मेळाव्यास राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मनसेच्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पुणे दौरा होत आहे.

  • 09 Jan 2024 07:26 AM (IST)

    Marathi News | पुण्यात जेएन 1 चा धोका वाढला

    पुण्यात कोरोनाचा नवीन व्हेरीयंट जेएन 1 चा धोका वाढला आहे. राज्यातील एकूण कोरोनाची रुग्णसंख्या २५० वर पोहोचली. त्यातील तब्बल १५० रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या ५९ रुग्णांची नोंद झाली आहे.

  • 09 Jan 2024 07:14 AM (IST)

    Marathi News | कोकणात पाऊस, आंबा बागायतदारांना फटका

    रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये अचानक पाऊस सुरू झाला आहे. रिमझिम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. नवीन मोहरलेल्या आंबा कलमांसाठी रिमझिप पाऊस धोकादायक आहे.