Free Corona Vaccination | महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

| Updated on: Apr 28, 2021 | 3:09 PM

महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Maharashtra Free Corona Vaccination Drive )

Free Corona Vaccination | महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
सांकेतिक फोटो
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. पाच कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या एक मेपासून महाराष्ट्रासह देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. (Maharashtra Free Corona Vaccination Drive 18 plus Citizens to get free COVID vaccine)

महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या फक्त 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे. मात्र राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु करताना मुबलक लसी, कर्मचारी वर्ग यांची सोय सरकारला करावी लागणार आहे.

दरम्यान, लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजतागायत 45 च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच 18 ते 44 च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न

सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.

उत्तम नियोजन करावे

18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे

कोविन अॅपवर नोंदणी करा

या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल अॅपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात.

लॉकडाऊन वाढण्याची चिन्हं

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. सात दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा, असं मत राज्यातील टास्क फोर्सने मांडलं होतं, मात्र 13 मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवावा असे काही मंत्र्यांचे मत आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा अंदाज

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकित टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

1 मे रोजी 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार नाही?; वाचा, आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे लसींचा साठा आहे का; पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

(Maharashtra Free Corona Vaccination Drive 18 plus Citizens to get free COVID vaccine)