मुंबईशी माझं भावनिक नातं, पोलीस आयुक्तपदाची धुरा घेताच संजय पांडेंच मुंबईकरांना पत्र

मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि अंमलदारांच्या साथीने मी मुंबईकर जनतेला आश्वस्त करु इच्छितो, की त्यांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस 24 तास सज्ज आहेत, असंही संजय पांडे यांनी लिहिलं आहे

मुंबईशी माझं भावनिक नातं, पोलीस आयुक्तपदाची धुरा घेताच संजय पांडेंच मुंबईकरांना पत्र
संजय पांडे
| Updated on: Mar 03, 2022 | 2:41 PM

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी (Mumbai Police Commissioner) नियुक्ती झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुंबईकरांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. मुंबईकर जनतेची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाचे आहे. अनेक वेळा अगदी छोट्या सूचनाही मोठे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे योग्य सूचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, अशी हमी पांडेंनी पत्रातून दिली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार वाहणाऱ्या संजय पांडे यांना 28 फेब्रुवारीला मुंबई पोलीस आयुक्तपदाची (Mumbai CP) जबाबदारी देण्यात आली होती.

संजय पांडे यांच्या पत्रात काय?

मुंबईकर जनतेस

मुंबई शहराशी आणि त्या माध्यमातून आपल्याशी माझे एक भावनिक नाते जुळलेले आहे. गेली जवळपास 30 वर्षे मी या शहरात आणि पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिसांची स्वतःची एक गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. किंबहुना मुंबईच्या पोलिसांची नेहमीच स्कॉटलंडच्या पोलीसांशी तुलना होत आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाचा आयुक्त या नात्याने मुंबईकर जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. जे माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाचे आहे!

या कठीण काळात आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्यालाही अनेक अडचणी भेडसावत असणार. त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात काही सुधारणा होणे आवश्यक वाटत असल्यास व त्याबाबत आपल्या काही सूचना असल्यास मला 9869702747 या क्रमांकावर जरूर कळवा. अनेकवेळा अगदी छोट्या सूचनाही मोठे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे योग्य सूचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल!

दुसरीकडे मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि अंमलदारांच्या साथीने मी मुंबईकर जनतेला आश्वस्त करु इच्छितो, की त्यांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस 24 तास सज्ज आहेत.

धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा!
– संजय पांडे
पोलिस आयुक्त, मुंबई

पाहा मुंबई पोलीस आयुक्तांचे ट्वीट :

कोण आहेत संजय पांडे?

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. ते 1986 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्यानंतर संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

मुंबई पोलीस दलात खांदेपालट, संजय पांडे यांची आयुक्तपदी नियुक्ती