
महाराष्ट्रातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होत आहे. तब्बल ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा कस लागला आहे. त्यातच महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकांचे निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसह पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सत्तेची समीकरणे कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील महत्त्वाच्या २९ शहरांमध्ये ही निवडणूक होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी तब्बल १,७०० उमेदवार मैदानात आहेत. विशेष म्हणजे, ७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यापासून गेल्या ४ वर्षे पालिकेचा कारभार प्रशासकामार्फत पाहिला जात होता. अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना आपले लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळत आहे.
मुंबईत प्रामुख्याने तीन प्रमुख आघाड्या रिंगणात आहेत, ज्यांनी पारंपरिक समीकरणे बदलून टाकली आहेत.
ठाकरे बंधूंची युती: तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे राज ठाकरे यांनी एकत्र येत युती केली आहे. मुंबईतील ९७ जागांवर ही आघाडी भाजपला थेट टक्कर देत आहे. मराठी अस्मिता हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे.
महायुती : यात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढत आहेत. सत्ताधारी भाजप १३७ आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० जागा लढवत आहेत.
काँग्रेस-वंचित आघाडी: काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली आहे. या आघाडीत डावे पक्ष आणि रासपचाही समावेश आहे. काँग्रेसने १४३ जागांवर उमेदवार दिले असून, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला ६२ जागा दिल्या आहेत.
राष्ट्रवादी : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर शरद पवारांनी ठाकरे बंधूंसोबत युती केली आहे.
दरम्यान प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मुंबईतील मराठी माणसाच्या स्थितीला ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या २५ वर्षांच्या सत्तेत शिवसेनेने नक्की काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावरून मतदारांना साद घातली आहे.