
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यानंतर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुका आता ऑक्टोबर महिन्यानंतर होतील, हे निश्चित झाले आहे. या निवडणुकांसाठीच्या प्रभागरचनेचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यानुसार येत्या ऑक्टोबर महिन्यात ही प्रभाग रचना अंतिम होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना ६ ऑक्टोबरनंतर, तर ‘ड’ वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना १३ ऑक्टोबरला अंतिम होईल, असे यात नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्यासाठीचे परिपत्रक नुकतंच जाहीर करण्यात आले. या परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे कसे असणार याबद्दल जाणून घेऊया.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. कोरोना संसर्ग आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत. २०२० पासून राज्यात अनेक वेळा निवडणुकांची तयारी झाली असली तरी, त्या प्रत्यक्ष झाल्या नाहीत. आता नवीन प्रभागरचनेच्या वेळापत्रकानुसार, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मतदानाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि यासाठी निवडणूक आयोग तयारी करत आहे.